Wed, Nov 14, 2018 14:40होमपेज › Goa › शिवरायांच्या पुतळ्याचे आज वाळपईत आगमन

शिवरायांच्या पुतळ्याचे आज वाळपईत आगमन

Published On: Feb 16 2018 1:53AM | Last Updated: Feb 16 2018 12:53AMवाळपई ः प्रतिनिधी

वाळपईत 19 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती व अश्‍वारूढ शिवपुतळा अनावरण कार्यक्रमात सत्तरीतील नागरिकांनी, शिवप्रेमीनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार बनावे, असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी केले आहे. पुतळ्याचे आगमन  शुक्रवार 16  रोजी दुपारी 3.30 वा बेळगाव कर्नाटक राज्यातून केरी सत्तरी या ठिकाणी होणार आहे,असेही त्यांनी सांगितले.

वाळपईवासियांच्या  मागणीनुसार वाळपईतील छ. शिवाजी महाराज  पालिका उद्यानात 12 फूट उंचीचा छ. शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून यासाठी सर्व पूर्वतयारी पूर्ण झाली आहे, असे आरोग्यमंत्री राणे यांनी शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित खास बैठकीत सांगितले. या पुतळ्याचे आगमन केरीमार्गे मोर्ले, होंडा आदी भागातून भव्य मिरवणुकीद्वारे वाळपईत  होणार आहे. या मिरवणुकीत शिवप्रेमी नागरिकांनी आपापल्या दुचाकी, चारचाकी वाहनांसह मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर मिरवणुकीस दुपारी 3 30 वा केरी टोलनाका येथून प्रारंभ होणार आहे, असे राणे यांनी सांगितले.

शिवजयंती आयोजनासंदर्भात  आयोजित बैठकीत कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष तथा वाळपईच्या नगराध्यक्षा परवीन शेख, कार्याध्यक्ष अ‍ॅड. यशवंत गावस, जिल्हा पंचयात सदस्य   प्रेमनाथ हजारे, जिल्हा पंचायत सदस्य फटी गावकर, निमंत्रक विनोद शिंदे, सचिव प्रसाद खाडीलकर, सहसचिव उदय सावंत आदी हजर होते. नियोजित कार्यक्रमानुसार सकाळी 9 वा. वाळपईच्या सरकारी  उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावरून शिवजयंती मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. सदर मिरवणूक वाळपईच्या बाजाराला वळसा घालून नगरपालिकेच्या उद्यानात येणार आहे व नंतर याठिकाणी अश्‍वारूढ पुतळ्याचे आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांच्या हस्ते व समितीच्या इतर पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत अनावरण होणार आहे.  त्यानंतर प्रा. अनिल सामंत यांचे शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर  व्याख्यान होईल, असे सांगण्यात आले आहे. विनोद शिंदे यांनी आभार  मानले.