Sun, Apr 21, 2019 13:53होमपेज › Goa › दुचाकी रुग्णवाहिका गुरुवारपासून सेवेत

दुचाकी रुग्णवाहिका गुरुवारपासून सेवेत

Published On: Feb 06 2018 1:44AM | Last Updated: Feb 05 2018 11:59PMपणजी : प्रतिनिधी

कर्नाटक राज्यानंतर तातडीच्या रुग्णसेवेसाठी दुचाकी रुग्णवाहिका उपलब्ध करणारे गोवा हे दुसरे राज्य ठरणार आहे. 25 दुचाकी रुग्णवाहिकांचे लोकार्पण 8 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी  दिली.

राज्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य  सेवा मिळाव्यात  तसेच कमीत कमी वेळेत लोकांपर्यंत पोहोचता यावे, या द‍ृष्टीने आरोग्य  खात्याकडून हे पाऊल उचलण्यात येत आहे, असेही राणे यांनी  सांगितले. राज्यात 108 रुग्णवाहिका कार्यरत असून दुचाकी रुग्णवाहिका या एकप्रकारे आकर्षण  ठरणार आहे. देशातील कर्नाटक राज्य वगळता देशात अन्य कुठल्याही राज्यात अशा प्रकारच्या दुचाकी रुग्णवाहिका कार्यरत नाहीत. त्यामुळे त्या सुरू करणारे गोवा हे दुसरे ठरणार आहे. सरकारकडून पहिल्या टप्प्यात 25 दुचाकी रुग्णवाहिका सुरू केल्या जातील. त्यानंतर येत्या सहा महिन्यांत   उर्वरित 25 रुग्णवाहिका कार्यरत केल्या जाणार आहेत. राज्यात एकूण  50 दुचाकी रुग्णवाहिका  सुरू  केल्या जाणार आहेत.  किनारी भागांप्रमाणेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणी या दुचाकी रुग्णवाहिका सेवा देतील, असे आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.