Fri, Jul 19, 2019 05:51होमपेज › Goa › एफडीएच्या दोन भिन्न अहवालांमुळे संभ्रम

एफडीएच्या दोन भिन्न अहवालांमुळे संभ्रम

Published On: Jul 15 2018 1:28AM | Last Updated: Jul 14 2018 11:57PMमडगाव : प्रतिनिधी

अन्न आणि औषध प्रशासनाने माडेल येथील घाऊक मासळी बाजारात टाकलेल्या छाप्यानंतर फार्मोलिन रसायनाच्या दोन चाचण्यांचे दोन वेगवेगळे अहवाल आल्याने गोमंतकीयांच्या मनात संभ्रम निर्माण झाला असून याचे परिणाम एसजीपीडीए येथील किरकोळ विक्रेत्यांना व हॉटेल मालकांना भोगावे लागत आहेत. मडगावच्या किरकोळ मासळी बाजारात गेले दोन दिवस शुकशुकाट असून  ताटातील  शीत, कढी, नुस्त्यांवर तुटून पडणारे गोवेकर  मत्स्याहारापासून  दुरावले आहेत. 

माडेल येथील घाऊक मासळी बाजारावर दोन दिवसांपूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकून   आयात मासळीचे सुमारे 17 ट्रक रोखले. मासळीचे नमुने घेऊन त्याची त्याचक्षणी फिरत्या प्रयोगशाळेत चाचणी केल्यावर मासळीत फार्मोलिन या  घातक  रसायनाचा अंश आढळल्याचा सकारात्मक अहवाल आला. मात्र, पुन्हा हेच नमुने बांबोळी येथील प्रयोगशाळेत तपासल्यावर फार्मोलिनचा नकारात्मक अहवाल आल्याने गोमंतकीयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तर दुसर्‍या दिवशी घाऊक मासळी मार्केट समितीचे अध्यक्ष  मौलाना इब्राहिम यांनी  घाऊक बाजार सुरू होताच आदल्यादिवशी अडकलेल्या मासळी ट्रकांसोबत केरळ, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथून नव्याने दाखल झालेली पाच ट्रक मासळी हातोहात विकली गेल्याचे  सांगितले होते. मात्र, एसजीपीडीए मार्केटमध्ये गेल्या दोन दिवसांपासून शुकशुकाट पसरला असून 80 टक्के ग्राहकांनी मासळी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. 

काही किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले की, छाप्यानंतरही नेहमीप्रमाणे किरकोळ मासळी बाजारात कोळंबी, पेडवी, बांगडे, खापी,  इसवण, तारले, ही मासळी विक्रेत्यांनी आणली असून खुबे, तिसर्‍या आणले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांत बाजारात ग्राहकांची  वर्दळ अत्यंत कमी झाली असून मासळी खरेदी करणार्‍यांनी हजार प्रश्न विचारून मासळी खरेदी केली आहे. हे मासे अत्यंत चांगले असून यात कोणतेच घातक रसायन नाही. याची आम्हाला खात्री आहे. मात्र, लोकांचा यावर विश्वास बसणे   कठीण झाले आहे. मासे खरेदी न झाल्याने मासळीचा दर्जा उतरला आहे. दरम्यान,  दोन दिवसांत  खूप नुकसान आम्हाला सोसावे लागले.