Sun, Nov 18, 2018 18:00होमपेज › Goa › कुख्यात गुंड अन्वर शेखसह दोघे गजाआड

कुख्यात गुंड अन्वर शेखसह दोघे गजाआड

Published On: Mar 09 2018 1:34AM | Last Updated: Mar 09 2018 12:27AMमडगाव : प्रतिनिधी

पोलिसांच्या गाडीला धक्‍का देऊन पळून जाण्याच्या तयारीत असलेला मडगावातील कुख्यात गुंड, तसेच मडगावात तीन खुनी हल्ल्यांबरोबर खंडणी प्रकरणात पोलिसांना हवा असलेला टायगर ऊर्फ अन्वर शेख याच्या मुसक्या आवळण्यात मडगाव आणि फातोर्डा पोलिसांना यश आले आहे. बुधवारी रात्री उशिरा अन्वर शेख हा चिदंबर चणेकरसह फॉर्च्युनर गाडीतून पळून जाण्याच्या बेतात होता. पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. फॉर्च्युनरच्या धडकेत पोलिसांच्या बोलेरो गाडीचे नुकसान झाले असून  पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्यासह पाच पोलिस जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुख्यात गुंड अन्वर शेख विरोधात तिघा जणांवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे. खारेबांद येथील टायसन नामक युवकावर जीवघेणा हल्ला केल्याचा त्याच्यावर गुन्हा नोंद आहे. शिवाय दर्शना जाधव या महिलेसमवेत  खंडणी वसूल करण्याचा गुन्हाही त्याच्यावर नोंद होता. मडगाव पोलिस स्थानकात नोंद असलेल्या तीन विविध गुन्ह्यांप्रकरणी पोलिसांना तो हवा होता. अन्वर चंद्रावाडा येथे असल्याची माहिती बुधवारी रात्री पोलिसांना मिळाली होती. मडगाव पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी पोलिस फौजफाटा घेऊन त्याला पकडण्याचा बेत आखला. अन्वर  रेखा बार अँड रेस्टोरेन्टचा मालक चिदंबर चणेकर याच्या बरोबर फॉर्चूनर गाडीमध्ये होता. पोलिसांनी अंबाजी येथे चिदंबर याला गाडी थांबविण्याची सूचना केली होती, मात्र तो न थांबल्याने पोलिसांनी त्यांना बोर्डा येथील मल्टिपर्पज जवळ  बोलेरो गाडी आडवी घालून  पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र चणेकर याने बोलेरोला धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यात पोलिसांच्या बोलेरोसह चणेकरच्या गाडीच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले.त्याही स्थितीत पोलिसांनी पाठलाग करत  दोघांना ताब्यात घेतले. या धडकेमुळे पोलीस जखमी झाले आहेत.

पोलीस निरीक्षक कपिल नायक यांनी चिदंबर चणेकर याच्या विरोधात पोलिस मालमत्तेचे नुकसान आणि सरकारी कर्मचार्‍यांच्या कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी फातोर्डा पोलिस स्थानकात तक्रार नोंद केली आहे. उपचारानंतर चणेकर याला फातोर्डा पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची फॉर्च्यूनर गाडी जप्त केली आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कुख्यात गुंड अन्वरवर गोव्यातील अनेक पोलीस स्थानकांत अठरा गुन्हे नोंद आहेत. त्याला मडगाव पोलिसांनी चार दिवसांच्या पोलिस कोठडीत ठेवले आहे.