Fri, Nov 16, 2018 01:04होमपेज › Goa › वेश्या व्यवसायप्रकरणी मडगावात दोघांना अटक; आंध्रच्या दोन युवतींची सुटका 

वेश्या व्यवसायप्रकरणी मडगावात दोघांना अटक; आंध्रच्या दोन युवतींची सुटका 

Published On: Aug 21 2018 1:35AM | Last Updated: Aug 21 2018 1:35AMमडगाव : प्रतिनिधी

मडगाव-पिंपळकट्टा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये चालत असलेल्या  वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करून मडगाव पोलिसांनी सोमवारी दुपारी गेस्ट हाऊस मालक जयेश वेर्लेकर (वय 38, मडगाव) याच्यासह एका ग्राहकाला अटक केली. या कारवाईत  पोलिसांनी आंध्र प्रदेशमधील दोन युवतींची सुटका करून त्यांची मेरशीतील महिला सुधारगृहात रवानगी केली.

मडगाव पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळकट्टा येथे स्टेशन रोडनजीक सदर गेस्ट हाऊस आहे. या गेस्ट हाऊसमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना खबर्‍यांकडून मिळाली होती. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी या गेस्ट हाऊसवर कारवाई केली असता पोलिसांनी ग्राहक विश्‍वजित बिश्‍वास (वय 24, कोलकाता) याला पीडित युवतीबरोबर आक्षेपार्ह स्थितीत पकडले. सदर पीडितेसह गेस्ट हाऊसमध्ये असलेल्या दुसर्‍या युवतीचीही सुटका करण्यात आली.

वेश्या व्यवसायातून चरितार्थ चालविणे, मानवी तस्करी आणि कुंटणखाना चालविणे या गुन्ह्यांखाली पोलिसांनी गेस्ट हाऊस मालकाविरूध्द गुन्हा नोंद केला आहे. दोन्ही पीडित युवतींना मेरशी येथील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.