Mon, Apr 22, 2019 11:43होमपेज › Goa › राज्यात तीन नव्या फेरीबोटी दाखल

राज्यात तीन नव्या फेरीबोटी दाखल

Published On: Apr 18 2018 12:48AM | Last Updated: Apr 18 2018 12:48AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात तीन नव्या फेरीबोटी दाखल झाल्या आहेत. पणजी फेरी धक्क्यावर मंगळवारी ‘मळार, आगापूर आणि वाडी-तळावली’ या तीन फेरीबोटींचे मंत्री ढवळीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यानंतर पत्रकारांशी बोलताना ढवळीकर म्हणाले की, एक वर्षापूर्वी विधानसभेत तीन फेरीबोटी बांधणार, असे आश्‍वासन दिले होते. त्या आश्‍वासनाची आज पूर्ती करण्यात आली आहे. खात्याकडे असलेल्या पाच फेरीबोटी गंजलेल्या व जर्जर अवस्थेत आहेत. येत्या वर्षात त्या बदलण्यात येणार असून त्यांच्या जागी नवीन फेरीबोटी आणण्यात येतील. नवीन बांधण्यात येणार्‍या फेरीबोटीमध्ये दुहेरी इंजिन असल्याने एक इंजिन बिघडल्यास दुसर्‍या इंजिनाचा वापर करणे शक्य होणार आहे. राज्यातील लांब पल्ल्याच्या जलमार्गावर या बोटी सेवेत रूजू करण्यात येणार आहेत. 

राज्यातील रायबंदर-चोडण, कुठ्ठाळी-मडकई आणि कुठ्ठाळी- दुर्भाट या तीन जलमार्गांसाठी नव्या फेरीबोटी बांधण्यात आल्या आहेत. या तीन नवीन फेरीबोटी तयार करण्यासाठी खात्याला एकूण 1.90 कोटी रूपये खर्च आला आहे. या फेरीबोटींमध्ये 100 अश्‍वशक्ती क्षमता असलेले एक इंजिन असून त्यांना दोन वर्षांची हमी असल्याची  माहिती  ढवळीकर यांनी दिली.

राज्यातील काही नद्यांमध्ये गाळ साचत असल्याने फेरीबोटींना ये-जा करण्यासाठी अडचणी येत आहेत. यासाठी केंद्राकडून मिळणार्‍या 200 कोटींच्या मदतीने दक्षिण गोव्यातील साळ नदी आणि उत्तरेतील मांडवी नदीतील गाळ उपसा केला जाणार आहे. राज्यातील नदींतील गाळ उपसा करण्यासाठी फक्‍त केंद्राचा आधार घेतला जाणार आहे. या नद्यांवर राज्याचाच अधिकार कायम राहणार आहे, असे नदी परिवहनमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्यावेळी बंदर कप्तान जेम्स ब्रगांझा, धेंपो शिपबिल्डींगचे संचालक यतिश धेंपो, नदी परिवहन खात्याचे अन्य अधिकारी उपस्थित होते. 

Tags : goa news, three new ferryboat issue, Boat, Minister Dhavalikar, inaugurated,