Sun, Aug 18, 2019 20:35होमपेज › Goa › ...तर बेरोजगारांना 10 हजार रुपये भत्ता द्या 

...तर बेरोजगारांना 10 हजार रुपये भत्ता द्या 

Published On: Jun 18 2018 1:10AM | Last Updated: Jun 18 2018 12:04AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात 1.22 लाख बेरोजगार युवकांची विनिमय केंद्रात नोंद असून या बेरोजगारांना  रोजगार मिळावा यासाठी राज्य सरकारने सर्व उद्योगातील 80 टक्के जागा गोमंतकीयांना  देणे बंधनकारक करावे; यासाठी कोकणी भाषेचे ज्ञान आणि 15 वर्षांचा वास्तव्याचा दाखला अनिवार्य करावा, सरकारला हे जमत नसेल तर बेरोजगार युवकांना दरमहा 10 हजार रुपये बेकारी भत्ता  द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार लुईझीन फालेरो यांनी केली. 

राज्यात येणार्‍या नव्या उद्योगांना   सरकारकडून करभरणा सुट्टी, 24 तासांत अस्थायी नोंदणी, प्रत्येक गोमंतकीयाला काम देण्यासाठी वर्षाला 15 हजार रुपये देणे आदी योजना लागू केल्या आहेत. मात्र, खासगी आस्थापनांमध्ये 80 टक्के युवकांना रोजगार  मिळवण्यास अपयश आले आहे. रोजगार नसल्याने युवा पिढी अंमली पदार्थाचे सेवन करणे, जुगार खेळणे आणि चोर्‍यामार्‍या करणे, यांसारख्या वाईट प्रवृत्तींकडे वळत आहे.  यासाठी, आपण कामगार मंत्री असताना 1991 साली मांडलेले ‘गोवा बेरोजगार भत्ता आणि स्वयंरोजगार योजना’ विधेयक विधानसभेत पुन्हा मांडून मंजूर करावे, अशी मागणी आमदार फालेरो यांनी केली.

भारतात 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांच्या आतील वयाची असून त्यात बेरोजगारांना उदरनिर्वाह करण्यासाठी सरकारने मदत करण्याची गरज आहे. यासाठी तात्पुरत्या काळासाठी बेरोजगार गोमंतकीय युवकांना महिना 10 हजार रूपयांचा बेरोजगार भत्ता देण्याची आपली मागणी आहे. तसेच राज्यातील उद्योगक्षेत्रात स्थलांतरीत कामगारांची संख्या 65 टक्के झाली असून या लोकांसाठी अतिरिक्‍त घरे, पाणी, वीज, रस्ते आदी साधनसुविधा सरकारने निर्माण करण्याची  आवश्यकता असल्याचे फालेरो म्हणाले.या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते अ‍ॅड. यतीश नाईक आणि विजय पै उपस्थित होते. 

राज्यात 1 लाख 22 हजार नोंदणीकृत बेरोजगार  

गोव्यात 1 लाख 22 हजार युवकांची रोजगार विनिमय केंद्रात नोंद झाली असून एकूण 15 लाख लोकसंख्येत हे प्रमाण 8.09 टक्के आहे.  यातील 77 हजार 595 जणांची पणजीत तर उर्वरित 44 हजार 411 जणांची मडगाव केंद्रात नोंद झाली आहे. या बेरोजगारांपैकी 64 हजार 287  पुरुष आणि 57 हजार 719 महिला आहेत. राज्यात 41 हजार 906 बेरोजगार पदवीधर असून 30 हजार 911 शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले असल्याचे आमदार लुईझीन फालेरो यांनी सांगितले.