Tue, Mar 19, 2019 20:50होमपेज › Goa › गोव्याची केरळसारखी स्थिती होण्याचा धोका

गोव्याची केरळसारखी स्थिती होण्याचा धोका

Published On: Aug 19 2018 1:30AM | Last Updated: Aug 19 2018 12:41AMपणजी : प्रतिनिधी

केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे कित्येक लोकांचे   प्राण गेले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.  राज्यात सुरू असलेल्या पर्यावरण घातक व बेकायदेशीर कामांवर  नियंत्रण ठेवले नाही तर गोव्यातदेखील केरळसारखी स्थिती निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सिध्दार्थ कारापूरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. 

कारापुरकर म्हणाले, विकासाच्या नावाखाली  बेकायदेशीररित्या होणारा खाण व्यवसाय, झाडांची कत्तल यासारख्या प्रकारांमुळेच पूर येऊन आज केरळची दशा फार वाईट आहे. आपला गोवादेखील त्याच मार्गावरून जात आहे. जंगलतोड, डोंगर कापणी,  खाण व्यवसाय यातून दिसणारी माणसाची  लालची वृत्तीच या आपत्तीला जबाबदार आहे.  ‘आप’चे नेते एल्वीस गोम्स म्हणाले, या सर्व बेकायदेशीर बाबींवर आळा घालणे गरजेचे आहे. सर्रास सुरू असलेल्या  झाडांच्या कत्तलीवर नियंत्रण गरजेचे आहे. केरळ सारखीच स्थिती राज्यात निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच प्रयत्न व्हायला हवेत. 

राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेल्यास आपण नंतर सावरू शकणार नाही. सरकारी यंत्रणा सध्या निरुपयोगी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे याबाबतीत विचार करून सरकारने वेळीच पावले उचलणे आवश्यक आहे,असेही ते म्हणाले.

‘आप’च्या स्वयंसेवकांना केरळमधील आपदग्रस्तांच्या मदतीसाठी निधी जमविण्याविषयी सांगण्यात आले आहे. आमच्यापरीने आम्ही होईल तितकी केरळच्या लोकांना मदत करू, असेही गोम्स म्हणाले.