Sat, Mar 23, 2019 12:14होमपेज › Goa › म्हादईचा प्रवाह बंदच 

म्हादईचा प्रवाह बंदच 

Published On: Jan 29 2018 12:28AM | Last Updated: Jan 29 2018 12:28AMपणजी/डिचोली : प्रतिनिधी

म्हादई लवाद आणि गोव्याच्या अवमान याचिकेच्या भीतीने कर्नाटक गोव्याच्या दिशेचा बांध फोडल्याचे स्पष्टीकरण देत आहे. यात कोणतेही तथ्य नाही. कर्नाटकाने वरवर बांध फोडून धूळफेक चालवली असून गोव्याकडे येणारा म्हादईचा प्रवाह पूर्णपणे बंद केला आहे, असा आरोप सभापती प्रमोद सावंत यांनी रविवारी  केला. 

कणकुंबीत म्हादई खोरे व कळसा प्रकल्पाच्या कामाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

उपसभापती मायकल लोबो, आमदार एलिना साल्ढाणा, आमदार  प्रसाद गावकर, माजी आमदार मोहन आमशेकर, अ‍ॅड.बाबुसो गावकर, नरहरी हळदणकर, सायमन डिसोझा, विनयकुमार उसगावकर, विश्‍वास सतरकर, धर्मा चोडणकर, शंभू भाऊ बांदेकर, डॉमनिक फर्नांडिस यांच्यासह सुमारे 100 जणांना व पत्रकारांना घेऊन सभापतींनी कणकुंबीला भेट दिली.

सभापती सावंत म्हणाले की, म्हादई नदीसंबंधी प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे, याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात आला. सुमारे 10 मीटर खोलीच्या पाच किलोमीटर लांबीच्या कालव्याद्वारे म्हादई नदीचे नैसर्गिक पात्र  मलप्रभेकडे वळवण्यात आले आहे. या ठिकाणावरील मातीचा बांध  सुमारे 70 ते 75 टक्के हटवण्यात आला असला तरी गोव्याकडे जाणारे पाणी पूर्णतया कमी झाले आहे. यामुळे राज्याच्या हद्दीतील झरे आणि ओढे आटल्याचे आढळून आले आहे. आता पावसाळ्यातच म्हादईचे पाणी गोव्याला मिळणार, असे वाटते. सध्याची परिस्थिती गोव्यासाठी अत्यंत घातक आणि नुकसानदायी आहे. 

म्हादई बचाव आंदोलन समितीच्या अध्यक्षा निर्मला सावंत, राजेंद्र केरकर व त्यांच्या सहकार्‍यांनी सुरू केलेल्या लढ्याला बळ देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

आमदारांच्या अनास्थेबद्दल नाराजी

राज्यातील 40 आमदारांपैकी फक्‍त चार आमदारांनी रविवारच्या कणकुंबी दौर्‍याला जातीने हजेरी लावली असली तरी अन्य आमदारांनी साधी उपस्थितीही लावली नसल्याबद्दल सभापती प्रमोद सावंत यांनी नाराजी व्यक्‍त केली. ते म्हणाले, राज्यात बसून ‘गोंयकारपण’ आणि गोव्याच्या अस्मितेवर बोलणे सोपे आहे. कणकुंबीत कर्नाटकाने केलेली फसवणूक स्वत: अनुभवली असती तर म्हादईसाठी असलेली कळकळ जनतेसमोर आली असती, असा टोमणा त्यांनी हाणला.