Sat, Feb 23, 2019 03:59होमपेज › Goa › मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असेपर्यंत सरकारला पाठिंबा

मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी असेपर्यंत सरकारला पाठिंबा

Published On: Feb 22 2018 1:39AM | Last Updated: Feb 22 2018 1:39AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री पदावर जोवर  मनोहर पर्रीकर आहेत तोपर्यंत सरकारचा पाठिंबा काढून घेतला जाणार नाही, असे भाजपप्रणीत सरकारच्या घटक पक्षांतील महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पक्ष यांच्यातर्फे   बुधवारी सांगण्यात आले. 

गोवा  विधानसभेच्या 40 सदस्यांमध्ये भाजपचे 14 आमदार, मगोचे 3 आमदार, गोवा फॉरवर्ड पक्षाचे 3 आणि   अपक्ष तीन आमदारांचा पाठिंबा मिळून 21 जणांचे बहुमत आहे. मुख्यमंत्री पर्रीकर स्वादूपिंडाच्या आजाराने मुंबईत लीलावती इस्पितळात सध्या उपचार घेत आहेत. 

याविषयी मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर  म्हणाले, की मगो पक्षाने गतसाली सरकार स्थापनेवेळीच शपथ घेतली होती, की पर्रीकर मुख्यमंत्रिपदावर असतील तरच भाजप आघाडी सरकारला पाठिंबा दिला जाईल. पर्रीकर लवकरच आजारातून  बरे होऊन गोव्यात परततील आणि मुख्यमंत्रिपदाचा ताबा घेतील, असा आमचा विश्‍वास आहे. पर्रीकर   आणखी काही काळ सक्रिय राहू शकले नाहीत तरी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची गरज पडणार नाही. पर्रीकर जोवर मुख्यमंत्री पदावर राहतील, तोपर्यंत मगोचा सरकारला पाठिंबा कायम आहे, असे  त्यांनी सांगितले. गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई म्हणाले, की पर्रीकर सध्या वैद्यकीय उपचार घेत आहेत. ते नेहमीच प्रत्येक लढाई यशस्वीपणाने लढून ते जिंकले आहेत. याही लढाईत ते जिंकून पुन्हा सरकारच्या प्रमुखपदी कार्यरत राहतील , यात कोणतीही शंका नाही.

भाजप आमदारांनी बुधवारी सभागृहात पर्रीकर लवकर बरे व्हावेत, अशा सदिच्छा  व्यक्‍त केली. भाजपचे मुख्य व्हीप तथा आमदार ग्लेन टीकलो म्हणाले, की पर्रीकर पुन्हा  या  सभागृहात हजर राहणार आहेत. आ. नीलेश काब्राल म्हणाले, की जे पर्रीकर यांच्यावर नेहमी टीका करायचे त्यांनीही त्यांचे आरोग्य सुधारावे म्हणून प्रार्थना केली आहे.