Fri, Apr 19, 2019 08:12होमपेज › Goa › ‘दाबोळी’वर अधिकार्‍यांना टुरिस्ट टॅक्सी चालकांचा घेराव

‘दाबोळी’वर अधिकार्‍यांना टुरिस्ट टॅक्सी चालकांचा घेराव

Published On: Jul 22 2018 1:02AM | Last Updated: Jul 22 2018 12:17AMदाबोळी ः प्रतिनिधी

दाबोळी विमानतळावर टुरिस्ट टॅक्सींना प्रवेश देण्यासाठी आकारण्यात येणारे शंभर रुपये शुल्क रद्द करावे, या मागणीसाठी अखिल गोवा टॅक्सी संघटनेच्या सदस्यांनी शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अखिल टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष बाप्पा कोरगावकर तसेच कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांच्या नेतृत्वाखाली अनेक टॅक्सी मालकांनी विमानतळ अधिकार्‍यांना घेराव घातला. शुल्क आकारणी काऊंटर तातडीने बंद करण्याचीही मागणी केली.

दाबोळी विमानतळावर टॅक्सींना प्रवेश शुल्क आकारणी रद्द करावी, अशी टॅक्सी चालकांची मागणी मांडताना आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले की, टॅक्सी व्यवसाय हा गोवेकरांचा जुना व्यवसाय असून यात हिंदू, ख्रिश्‍चन एकमेकांच्या सहकार्याने व्यवसाय चालवतात. परंतु दाबोळी विमानतळावर येण्यासाठी पाच मिनिटांचा अवधी दिला जातो, तो अवधी संपला की, पुन्हा  100 रु. आकारले जातात.
तसेच त्याहीपेक्षा अधिक अवधी वाढला तर अधिक प्रवेश शुल्क आकारले जाते हे चुकीचे आहे. येणारे प्रवासी वयस्कर असतात, लहान मुले, आई-वडील कुटुंबीय सोबत असतात. येणारे-जाणारे आशीर्वाद घेतात, नमस्कार करतात त्यासाठी प्रवाशांना वेळ द्यावा लागतो. परंतु त्याचे पैसे टॅक्सी मालक, चालकांना भरावे लागतात, हे चुकीचे आहे.  शुल्क आकारणीचे  काऊंटर त्वरित बंद करावे. काऊंटर बंद न केल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असेही रेजिनाल्ड यांनी सांगितले.

अखिल गोवा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष बाप्पा कोरगावकर यांनी सांगितले की, टॅक्सी व्यवसाय हा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय असून दाबोळी विमानतळ अधिकारी अशा प्रकारे प्रवेश शुल्क आकारतात, हे चुकीचे आहे. त्यापेक्षा आम्हाला प्रवाशांना विमानतळाच्या बाहेर रस्त्यावरच टॅक्सीतून उतरवावे  लागेल.
उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर, पोलिस उपअधीक्षक सुनिता सावंत, इतर पोलिस अधिकारी  यावेळी उपस्थित होते.