Thu, Apr 25, 2019 08:00होमपेज › Goa › ...तर स्टील उद्योग संकटात

...तर स्टील उद्योग संकटात

Published On: Mar 12 2018 1:04AM | Last Updated: Mar 11 2018 11:50PMपणजी : प्रतिनिधी

 राज्यात येत्या गुरुवारपासून (दि.15) लागू होणार्‍या खाणबंदीनंतर  येथील स्पाँज आयर्न आणि पिग आयर्न उद्योगांना कच्च्या मालाचा पुरवठा न झाल्यास स्टील उद्योग बंद पडेल, अशी भीती असून सर्व उद्योगांना कच्चे पोलाद पुरवण्याबाबत केंद्र सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी गोवा स्टील आणि अन्य मिश्र धातू उत्पादक संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे  केली आहे.

पोलाद हा स्टीलचे पदार्थ आणि अन्य वस्तूंच्या निर्मितीतील महत्त्वाचा घटक आहे. आमच्या विविध प्रकल्पांसाठी लागणार्‍या कच्च्या मालाला गोव्यातील पोलादाची अत्यंत आवश्यकता आहे. स्टीलचे उत्पादन करण्यासाठी आणि स्टीलसंबंधी  अन्य वस्तू तयार करण्यासाठीही पोलादाची गरज असतेे. याआधीच कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने एक प्रकल्प बंद पडला आहे. आता नव्या संकटामुळे सर्व स्टील उद्योग व्यवसायच ठप्प होण्याची भीती या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. 

यासाठी केंद्रीय स्टील उद्योग मंत्रालयाचे सचिव अरूण शर्मा यांना पोलाद आणि अन्य मिश्र धातू उत्पादन संघटनेने निवेदन दिले आहे. खाणबंदीनंतर पोलाद उद्योगावर मोठे संकट कोसळण्याची भीती या निवेदनात नमूद करण्यात आली आहे. राज्यातील स्पाँज आयर्न आणि पिग आयर्न उद्योगांना कच्चा माल मिळाला नाही तर या उद्योग व्यवसायांना फटका बसणार आहे. 

खाणबंदी झाल्यास स्टील उद्योगासोबत वाहतूकदार, दुरूस्ती, बंदरवरील कामगार, ट्रक चालक व अन्य घटकांना मोठा फटका बसणार आहे. याआधी स्टील उद्योगांना हातभार लावण्यासाठी केंद्राकडून भरीव मदत झाली असून ओडिसा राज्यातही कोळसा व पोलाद पुरवठा सुरळीत करण्यात आला असल्याचे संघटनेने नमूद केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारी 2018 रोजी दिलेल्या निवाड्यात राज्यातील 88 खाणींच्या लिजेसचे 2015 साली केलेले नूतनीकरण रद्द ठरविले आहे. राज्यातील सर्व खाणी येत्या 15 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद करून त्यांना लिलावाला सामोरे जाण्यास सांगितले गेले आहे.