Sun, Feb 23, 2020 08:55होमपेज › Goa › आजारी मंत्र्यांच्या खात्यांचाही अधिवेशनात पर्रीकरांवरच भार 

आजारी मंत्र्यांच्या खात्यांचाही अधिवेशनात पर्रीकरांवरच भार 

Published On: Jul 11 2018 1:36AM | Last Updated: Jul 11 2018 1:36AMपणजी : प्रतिनिधी

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी पडण्याची शक्यता आहे. विद्यमान सरकारातील मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नगरविकास मंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा आजारातून सावरत आहेत, तर वीजमंत्री  पांडुरंग मडकईकर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर इस्पितळात सध्या उपचार घेत आहेत. या चारही मंत्र्यांकडे मिळून 34 खाती असून काही प्रमाणात डिसोझा वगळता अन्य खात्यांशी संबंधित प्रश्‍नांचा पर्रीकर यांनाच सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे गृह, खाण, वित्त, दक्षता, प्रशासन, उद्योग, वन आदी मिळून सुमारे 25 खाती आहेत. या खात्यांसंबंधी विरोधी काँग्रेस पक्षाकडून येणार्‍या  प्रश्‍नांचा पर्रीकर यांना नेहमीसारखाच सामना करावा लागणार आहे. त्यात अर्थसंकल्पावरील अनुदानित मागण्या आणि खाणबंदी, कायदा व सुव्यवस्था, उद्योग, सरकारी योजनांसंबंधी अनेक खात्यांवरील प्रश्‍नांना तोंड द्यावे लागणार आहे. मात्र, आता विधानसभेत मंत्रिमंडळातील दोन मंत्री अनुपस्थित राहण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्र्यांवर अतिरिक्त जबाबदारी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मंत्री ढवळीकर येत्या आठवड्यात  राज्यात परतण्याची शक्यता त्यांचे बंधू तथा मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी व्यक्त केली आहे. मात्र शस्त्रक्रिया पार पडल्याने ते विधानसभेच्या कामकाजात कितपत सहभागी होेऊ शकतील याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. ढवळीकर यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते हे महत्वाचे आणि सर्वाधिक अर्थसंकल्पीय तरतूद असलेले खाते  आहे. तसेच त्यांच्याकडे वाहतूक, नदी परिवहन, वस्तूसंग्रहालय आदी खातीही आहेत. ढवळीकर  अधिवेशनात अनुपस्थित राहिले तर या खात्याशी संबंधित प्रश्‍नांनाही मुख्यमंत्री पर्रीकर यांनाच उत्तर द्यावे लागेल. अथवा हे प्रश्‍न पुढच्या अधिवेशनापर्यंत स्थगित ठेवावे लागणार आहेत. 

पर्रीकर यांनी मडकईकर यांच्याकडे असलेल्या वीज खात्याची अतिरिक्त जबाबदारी घेण्याचे तूर्त मान्य केले आहे. त्यामुळे विरोधकांच्या वीज पुरवठ्याबाबतच्या वाढत्या तक्रारींना पर्रीकर यांनाच तोंड द्यावे लागेल. त्याचबरोबर मडकईकर सांभाळत असलेल्या समाजकल्याण खात्याच्या योजनांबाबत विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागणार आहे. अपारंपरिक ऊर्जा या मडकईकरांच्या तिसर्‍या खात्यासंबंधी प्रश्‍नही पर्रीकर यांनाच हाताळावे लागणार आहेत. मंत्री डिसोझा यांच्याकडे नगर विकास, कायदा, विधिमंडळ आणि प्रोव्हेदोरिया आदी खाती आहेत. या खात्यांवर विरोधकांच्या तोफा गरजण्याची शक्यता असली तरी डिसोझा काही प्रमाणात ती बाजू सांभाळणार असल्याने  पर्रीकरांवरील ताण काही प्रमाणात कमी होणार आहे. मात्र, मुख्यमंत्री म्हणून त्यांना या खात्यांसोबत अन्य मंत्र्यांच्या खात्यांवरील प्रश्‍नोत्तरावेळी हजर राहून लक्ष ठेवावे लागणार आहे.