होमपेज › Goa › घाऊक मासळी बाजार वाळपईतच न्या : सरदेसाई

घाऊक मासळी बाजार वाळपईतच न्या : सरदेसाई

Published On: Jul 22 2018 1:02AM | Last Updated: Jul 22 2018 12:06AMमडगाव : प्रतिनिधी

फातोर्डा मतदारसंघातील घाऊक मासळी बाजाराच्या विषयावरून होत असलेल्या टीकेमुळे आक्रमक झालेल्या नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाईंनी आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांना हे मार्केट त्यांच्या मतदारसंघात हवे असेल तर त्यांनी ते खुशाल वाळपईत न्यावे, त्याला आपली हरकत नसेल, असे सांगितले.  घाऊक मासळी बाजार यापुढे अन्न आणि औषध प्रशासनाच्या अंतर्गत घ्यावा, असा प्रस्तावही त्यांनी राणेंपुढे ठेवला आहे.

माडेल येथील लोकांसाठी घाऊक मासळी बाजार म्हणजे एक डोकेदुखी बनलेला आहे. इब्राहिम मौलाना यांच्याकडून आपल्याला काही मिळत असल्याने आम्ही त्याला सांभाळत असल्याची अफवा सोशल मीडियातून पसरवली जात आहे. त्यामुळे हे मार्केट आम्हाला इथे नकोच, अशी भूमिका आपण घेतल्याचे सांगून आरोग्यमंत्री राणे यांना हवा असल्यास त्यांनी खुशाल तो वाळपईत न्यावा, असे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.

सरदेसाई म्हणाले, माडेल येथील घाऊक मासळी बाजार संपूर्ण गोव्यासाठी उपयुक्त  आहे, पण फातोर्ड्याला त्याचा कोणताच उपयोग नाही. सासष्टीत सात आमदार आहेत, त्यांनी एक जागा शोधून सोमवारी अधिवेशनात घाऊक मासळी बाजाराची मागणी करावी, असेही सांगितले.

लोकप्रतिनिधीला या घाऊक मासळी बाजारातून फायदा प्राप्त होतो, अशी टीका केली जात आहे. टीका करणार्‍याने माझे नाव घेऊन टीका करावी, असेही आवाहन सरदेसाई यांनी केले.

दहा हजार चौरस मीटर जागेत व्यापलेला हा बाजार दुसरीकडे नेण्यासाठी आपली कोणतीच हरकत नाही. हे मार्केट इथून गेल्यास या जागी लोकांसाठी रोजगार निर्मिती होऊ शकेल, असा सरकारी प्रकल्प उभारू, असे सरदेसाई म्हणाले. हे मार्केट आम्ही या ठिकाणी निमंत्रित केले नव्हते.आमदार दिगंबर कामत यांच्यामुळे एका रात्रीत या ठिकाणी हे मार्केट आले होते. आता कोणाला हवे असेल त्याने हे मार्केट येथून घेऊन जावे, असे सरदेसाई म्हणाले.

माडेल इथे कितीही विकासकामे केली तरी या मार्केटच्या घाणीमुळे प्रत्येक निवडणुकीत या भागातून आपली मते कमी होत चालली आहेत, असे सरदेसाई म्हणाले. लोकांना हे मार्केट इथे नको असल्यास आपण लोकांबरोबर आहे, असे त्यांनी सांगितले. पीडीए अंतर्गत हे मार्केट घेण्यापेक्षा स्वत: अन्न आणि औषध प्रशासनाने या मार्केटची सूत्रे हाती घ्यावीत, असा सल्ला सरदेसाई यांनी दिला आहे. पीडीए मार्केटला सुविधा पुरवू शकते पण इथे काय व्यवहार सुरू असतात, त्यात काय मिसळलेले असते याची तपासणी पीडीए करू शकत नाही.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या अनेक ठिकाणी जमिनी आहेत. त्यांनी आपल्या जागेत हे घाऊक मासळी  मार्केट घेऊन जावे, असे सरदेसाई म्हणाले. एका घाऊक मासळी बाजारासाठी दोन सरकारी यंत्रणांची कोणतीच अवश्यकता नाही. घाऊक मासळी बाजार पीडीए अंतर्गत चालण्यापेक्षा तो अन्न आणि औषध प्रशासनाच्या अंतर्गत चालवावा हे आपले विश्‍वजित राणे यांना आवाहन आहे, असे सरदेसाई म्हणाले.

या वेळी एसजीपीडीएच्या अध्यक्षा रेणुका दासिल्वा, जीएसायडीसीचे अधिकारी संदीप चोडणकर व इतर उपास्थित होते. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा खर्च  लाख रुपये असल्याची माहिती चोडणकर यांनी दिली. या टप्प्यात जमिनीचा विकास केला जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या दिवसात घाऊक मासळी बाजार बंद असल्याने ते कामाला सुरवात करणार असून 30 ऑगस्टपर्यंत जमिनीचा विकास करण्याचे काम पूर्ण होईल, असे सरदेसाई म्हणाले.