Thu, Nov 15, 2018 07:48होमपेज › Goa › त्रिमंत्री समितीला दुसर्‍यांदा मुदतवाढ

त्रिमंत्री समितीला दुसर्‍यांदा मुदतवाढ

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: Apr 30 2018 11:08PMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राज्याचा प्रशासकीय कारभार चालवण्यासाठी स्थापन केलेल्या त्रिमंत्री समितीला आणखी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. समितीचा कार्यकाळ सोमवार दि. 30 एप्रिल रोजी संपुष्टात येण्याच्या आधी या संदर्भातील आदेश पर्रीकर यांच्या आदेशानुसार, राज्य सरकारतर्फे  मुख्य सचिव धर्मेश शर्मा यांनी सोमवारी जारी केला. मुख्यमंत्री मे महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात गोव्यात परतण्याची शक्यता असल्याने त्रिमंत्री  समितीला आता 31 मे पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी उपचारासाठी अमेरिकेत जाताना  सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई आणि नगर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा  यांचा समावेश असलेली त्रिमंत्री सल्लागार समिती स्थापन केली होती.

प्रथम या समितीला 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर समितीला मुदतवाढ देऊन 30 एप्रिलपर्यंत कार्यकाळ वाढवून वित्तीय अधिकारातही वाढ करण्यात आली. आता मे महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात मुख्यमंत्री परतण्याची शक्यता असल्यामुळे या समितीला दुसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. पर्रीकर राज्यात परत येईपर्यंत सदर समितीच प्रशासनाचा कारभार पाहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

Tags : Goa, second, term, extension, three, minister, Committee