Sun, Jul 21, 2019 16:54
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › सत्तरीतील धबधब्यावर हुल्‍लडबाजांवर कारवाई

सत्तरीतील धबधब्यावर हुल्‍लडबाजांवर कारवाई

Published On: Jul 01 2018 1:52AM | Last Updated: Jun 30 2018 11:14PMवाळपई : प्रतिनिधी

पावसाळ्यात सत्तरी तालुक्यातील वेगवेगळ्या डोंगर भागातून कोसळण्यार्‍या धबधब्याच्या ठिकाणी येणार्‍या मद्यपी पर्यटक व हुल्लडबाजी करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश डिचोली उपजिल्हाधिकार्‍यांनी दिल्याने कडक अंमलबजावणी सुरू आहे. सत्तरीतील विविध ठिकाणी पोलिस, अबकारी, म्हादई अभयारण्याची  संयुक्तरित्या कारवाईत होत असल्याने  येथे होणार्‍या हुल्लडबाजीला लगाम बसणार आहे.

या परिसरात येणार्‍या पर्यटकांच्या वाहनांची संबंधित यत्रंणा कडक तपासणी करीत आहे. या तपासणीत किरकोळ प्रमाणात दारू बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई  रविवारीही हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शुक्रवारी दिवसभर पडलेल्या धुवाँधार पावसाने सत्तरी तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातील धबधबे ओसंडून वाहत आहेत. या धबधब्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमणात येथे येत असतात. खासकरून शनिवारी व रविवारी या दोन दिवसात राज्यातील पर्यटक मोठ्याप्रमाणात धबधब्याचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून  धबधब्यावर मद्य प्राशन करून धिंगाणा घालणे व इतर पर्यटकांना नाहक त्रास देण्याच्या प्रकारात वाढ झाल्याने यावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यामुळे स्थानिक पोलिस , अबकारी खाते, म्हादई  अभयारण्याचे कर्मचारी संयुक्तरित्या प्रतिबंधणात्म कारवाई करीत असतात. 

यंदाही अशाच प्रकारची कारवाई करण्याचे निर्देश डिचोली उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक यांनी दिल्यानंतर सदर कारवाई करण्यास शनिवारपासून सुरुवात झाली आहे. केरी बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट मार्गावर जाणार्‍या पर्यटकांच्या वाहनांची केरी याठिकाणी तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत दारूच्या किरकोळ बाटल्या जप्त करण्यात आल्याची माहिती संबंधित खात्याच्या सूत्रांनी दिली आहे. शहरातून चरावणे, हिवरे नगरगाव , शेळपे सालेली, पाली आदी भागातील धबधब्याच्या ठिकाणी जाणार्‍या पर्यटकांच्या वाहनांची ठाणे मार्गावर तपासणी करण्यात आली होती. या साठी सकाळी सात वाजल्यापासून सर्व संबंधित खात्याचे कर्मचारी वेगवेगळ्या मार्गावर तैनात करण्यात आले होते. म्हादई  अभयारण्य क्षेत्रामध्ये येणार्‍या धबधब्याच्या ठिकाणी प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आल्यानंतर याची अंमलबजावणी करण्यासाठी या परिसरामध्ये अभयारण्य कर्मचार्‍यांना तैनात करण्यात आले होते.