Sat, Aug 24, 2019 22:17होमपेज › Goa › ‘सांजाव’ जल्लोषात

‘सांजाव’ जल्लोषात

Published On: Jun 25 2018 1:46AM | Last Updated: Jun 24 2018 11:54PMपणजी : प्रतिनिधी 

फुलांनी सजवलेली गोलाकार चक्रे ‘कॉपेल’ डोक्यावर ठेवून नृत्य करत ‘व्हिवा सांजाव’ च्या उद्घोषात रविवारी ख्रिस्ती बांधवांनी राज्यभरात सांजाव सण मोठ्या जल्लोषात साजरा केला. सांजावचा मुख्य कार्यक्रम शिवोलीत साजरा करण्यात आला.

पणजीतील कांपाल, ताळगाव, सांताक्रुज भागात सांजावचे उत्साही वातावरण होते. विहिरी, तलावांवर सांजावसाठी ख्रिस्ती बांधवांनी गर्दी केली होती. सांजावला पाऊस अधून-मधून हजेरी लावत होता. पाण्याशिवाय सण साजरा केला जाऊ शकत नाही यासाठी अनेक ठिकाणी कृत्रिम पावसाची सोयदेखील करण्यात आली होती. काही ठिकाणी पाणी साठवून तलाव तयार केले होते. या तलावांमध्ये उड्या मारून आणि संगीताच्या तालावर ठेका धरून ख्रिस्ती बांधवांबरोवरच हिंदूधर्मीयांनीही एकत्र येऊन सांजाव साजरा केला. रविवार असल्याने लोकांनी सांजाव पहायला गर्दी केली होती. 

‘सांजाव, सांजाव घुंवता मुरे,’ ‘आयचो दिस उर्बेचो,’ ‘कोण कोणाक हासोना,’ ‘सांजाव पातोळ्यो मागोता’ अशी गाणी वाजवण्यात येत होती. राज्यभरातील ख्रिस्ती बांधवांनी डोक्यावर मुकुट, गळ्यात फुलांच्या माळा घालून सांजाव साजरा केला.  सांजाव उत्सवाची चर्चमधल्या प्रार्थनेने  सुरुवात करण्यात आली. चर्चमध्ये फादरने सां जुवांव यांच्या जन्मावर आणि त्यांनी समाजाला दिलेल्या संदेशावर प्रवचन दिले. गुलाब, अनंत, कलवंत, जास्वंद, मोगरी आदी फुलांनी सजवलेली गोलाकार चक्रे ‘कॉपेल’ डोक्यावर ठेवून नाचगाण्यास प्रारंभ  झाला.     

पणजीत कांपाल, ताळगाव, सांताक्रुज भागातील वाड्यावाड्यांवर खास सांजाव उत्सवासाठी कार्यक्रम आयोजण्यात आले होते. या भागातील विहिरी, तलाव  आदी ठिकाणी गर्दी झाली होती. कांपाल येथे दयानंद बांदोडकर मार्गावर दरवर्षीप्रमाणे मोठे कृत्रिम  तळे तयार करून  सांजाव साजरा केला. स्थानिकांसह देशी पर्यटकांनीही गर्दी केली होती. शिवोलीतील सांजावमधून गोवा कचरामुक्त करण्याचा तसेच सर्वांनी प्रेम, एकता व सलोखा राखण्याचा  संदेश  देण्यात आला.

शिवोलीतील सेंट अँथनी चर्चजवळ पारंपरिक  सांजाव  उत्साहात साजरा करण्यात आला. शिवोली  सांजाव सांस्कृतिक समिती आणि कला आणि संस्कृती खाते यांच्या संयुक्त विद्यमाने बोट फेस्टिवलचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते.  विविध गटांनी होड्या सजवून आणल्या होत्या.एकूण 9 बोटींनी यात सहभाग घेतला. विविध करमणुकीचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.