Thu, Jun 20, 2019 20:42होमपेज › Goa › सांगे धारगिणीत वाघाचे थैमान

सांगे धारगिणीत वाघाचे थैमान

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 13 2018 12:01AMमडगाव : प्रतिनिधी

वाळपई भागात गव्याच्या हल्ल्यात स्थानिक युवतीचा मृत्यू होण्याचे प्रकरण ताजे असताना सांगे येथील धारगिणी भागात काळ्या रंगाच्या वाघाने थैमान घातल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून धारगिणी येथील लोकांच्या घरात शिरून लोकांचा थरकाप उडविणार्‍या या वाघाने रविवारी (दि.12) भर वस्तीतील गोठ्यात बांधलेले वासरू मारून नेले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुशांत वेळीप यांनी सांगितले, की वन खात्याला कळऊन देखील वनखात्याने काहीच  उपाययोजना न केल्याने रविवारी वासारचा बळी गेला.

सुशांत वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यांपासून वाघाने धारगिणी परिसरात दहशत घातल्याचे सांगितले. काळ्या रंगाचा हा वाघ पूर्वी कधीच पाहण्यात आला नव्हता. हा वाघ सुमरे एक मीटर पेक्षा जास्त उंचीचा आहे. तीन महिन्यांपासून दर दिवशी सायंकाळी वाघ थेट गावात प्रवेश करतो.आत्तापर्यंत त्याने कित्येक पाळीव कुत्र्याचा फडशा पाडलेला आहे.  या वाघामुळे सायंकाळी घराबाहेर पडणे कठीण झालेले आहे. सायंकाळी मुले गावातील मैदानावर खेळतात. तिथेही या वाघाला पाहण्यात आले आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. युवासेनेचे अ‍ॅड. अमर नाईक यांनी कोणताही अनूचित प्रकार घडण्यापूर्वी वन खात्याने या वाघावर उपाय काढावा, अशी मागणी केली आहे. 

धुलो वेळीप यांनी सांगितले, की शनिवारी सायंकाळी वाघ गावात शिरला असता सर्वांनी त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला होता. हा वाघ लोकांच्या घरात शिरून बांधलेल्या कुत्र्यांना मारून खात आहे. घरात लहान मुले आणि वृद्धांना या वाघामुळे धोका निर्माण झालेला आहे. वनखात्याने उपाय काढावा, अशी मागणी वेळीप कुटुंबीयांनी केली आहे.