होमपेज › Goa › इस्पितळातून पळालेल्या घरफोड्या चिमास अटक

इस्पितळातून पळालेल्या घरफोड्या चिमास अटक

Published On: Aug 19 2018 1:30AM | Last Updated: Aug 19 2018 12:50AMमडगाव ः प्रतिनिधी

हॉस्पिसियोत उपचारासाठी दाखल केले असताना 4 ऑगस्टच्या रात्री पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या पॉल चिमा (वय 20, नेपाळ) या अट्टल घरफोड्याला अखेर फातोर्डा पोलिसांनी शिताफीने अटक केली. चिमाला लपण्यासाठी मदत केलेल्या सराईत झाकीर अली यालाही  अटक केली असून दोघांनाही सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

फातोर्डा पोलिस निरीक्षक नवलेश देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार मडगाव पोलिसांच्या ताब्यात असताना  4 ऑगस्ट रोजीच्या रात्री पोलिसांची  नजर चुकवून संशयिताने इस्पितळातून धूम ठोकली होती.  

पलायन करताना चिमा याने इस्पितळातील एका रुग्णाचा मोबाईल पळविला होता. त्याच मोबाईलमुळे संशयिताचा शोध घेण्यास पोलिसांना यश मिळाले. चिमा अनेक सीमकार्ड वापरून पोलिसांची दिशाभूल करत होता. तरीही पोलिसांनी सातत्याने या मोबाईलचा माग काढून संशयिताला जेरबंद केले. शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसांना संशयित चिमाचे मोबाईल लोकेशन वेर्णा येथील केसरव्हाल डोंगराळ भागात दिसले. त्यानुसार पोलिसांनी त्याठिकाणी असलेल्या वॉशिंग मशीन कंपनीच्या मालकाकडे चौकशी केली. चौकशीत चिमा हा त्या कंपनीत रात्रपाळीत काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याच परिसरातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर लपून बसलेल्या चिमाला पोलिसांनी अटक केली. संशयित झाकीर याने चिमाची राहण्याची, खाण्यापिण्याची सोय केली होती. शिवाय झाकीर हासुद्धा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. चिमा हा दिवसभर रानात लपायचा व रात्रपाळीत काम करत होता. तो झाकीर याच्यासोबत फ्लॅटमध्येही राहत होता. 

चिमा आणि झाकीर यांच्यावर घरफोडी, दुचाकी चोरी आदी अनेक प्रकरणी गोव्यातील विविध पोलिस स्थानकांत गुन्हे नोंद आहेत.

संशयिताच्या हाताला जखमा झाल्याने 4 ऑगस्ट रोजी त्याला हॉस्पिसियोत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चिमाने पलायन केल्याने त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी असलेले मडगाव पोलिस स्थानकाचे पोलीस कॉन्स्टेबल संजय वेळीप, रक्षित देविदास आणि हिरेश बुधवाडकर यांना निलंबित करण्यात आले आहे. फातोर्डा पोलिस पुढील तपास करत आहेत.