Wed, Apr 24, 2019 16:13होमपेज › Goa › ‘म्हापसा अर्बन’ संचालक मंडळाचा राजीनामा

‘म्हापसा अर्बन’ संचालक मंडळाचा राजीनामा

Published On: Sep 05 2018 2:13AM | Last Updated: Sep 05 2018 2:13AMम्हापसा : प्रतिनिधी

कर्मचारी आणि सभासदांच्या दबावापुढे नमते घेऊन म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाने अखेर मंगळवारी राजीनामा दिला. दरम्यान, संचालक मंडळाने राजीनामा दिल्याने त्यांनी आम्हाला वार्‍यावर सोडले आहे, अशी भावना कर्मचार्‍यांनी व्यक्‍त केली.

बँकेचे अध्यक्ष गुरुदास नाटेकर यांनी संचालक मंडळाने राजीनामा दिल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने कडक निर्बंध घातले आहेत. कुणालाही कर्ज देण्याचा  अधिकारही बँकेला राहिलेला नाही. म्हापसा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला कोणतेही उत्पन्न नसतानाही कर्मचार्‍यांना वेळेवर वेतन दिले जात आहे. मात्र तरीही कर्मचार्‍यांकडून संचालक मंडळाच्या राजीनाम्याची मागणी वाढली. त्यामुळे बँकेचा  आमच्या नसण्याने विकास होईल, ही सर्वांची भावना लक्षात घेऊन संचालक मंडळाच्या  बैठकीत  संचालकांनी संयुक्तपणे राजीनामा दिला. 

बारा संचालकांपैकी काहीजण या बैठकीस उपस्थित नव्हते. परंतु त्यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. सर्वांच्या सहीनिशी रिझव्हर्र् बँक, सहकार निबंधक व सरकारला राजीनामा पत्र पाठविण्यात येणार असल्याचेही नाटेकर यांनी सांगितले.

संचालक मंडळात चेअरमन गुरूदास नाटेकर, उपाध्यक्ष प्रज्ञा नाईक, संचालक अ‍ॅड.रमाकांत खलप, बाबुसो हडफडकर, शंभू भाऊ बांदेकर, निर्मला खलप, आश्‍विन खलप, तुलियो डिसोझा, रमेश पानकर, मंगलदास नाईक, मायकल कारास्को व स्वीकृत संचालक विनेश पिकळे यांचा समावेश होता.

संचालक मंडळाने राजीनामा दिल्यास बँकेचा उत्कर्ष होईल. सरकार सहकार्य करेल, असे तावातावाने सांगणारे बँकेचे कर्मचारी संचालक मंडळाने राजीनामा दिल्याने संतप्त होऊन आपल्याला वार्‍यावर सोडल्याची भाषा करीत आहेत. त्यामुळे त्यांची आगीतून फुफाट्यात गेल्याची स्थिती झाली आहे, अशी भावनाही नाटेकर यांनी पत्रकारांकडे व्यक्त केली.  
   
 सरकारने बँक वाचवावी : सुभाष नाईक जॉर्ज 

परिस्थिती आज वेगळी आहे. बँकेमध्ये कसलाच व्यवहार नाही, पगाराची शाश्‍वती नाही. त्यामुळे ‘आपल्याला कुणी वाली नाही, आपले व परिवाराचे भवितव्य काय’, असा प्रश्‍न कर्मचार्‍यांसमोर आहे. संचालक मंडळाने राजीनामा दिल्याने कायद्यानुसार सर्व अधिकार केंद्रीय निबंधकांकडे आहेत. आता सरकारने व आरबीआयने या बँकेला वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत. संघटना त्यासाठी पाठपुरावा करेल, असे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष नाईक जॉर्ज म्हणाले.