Thu, Sep 20, 2018 00:01होमपेज › Goa › आरक्षण ७५ टक्क्यांवर न्यावे : रामदास आठवले

आरक्षण ७५ टक्क्यांवर न्यावे : रामदास आठवले

Published On: Feb 27 2018 12:58AM | Last Updated: Feb 27 2018 12:46AMपणजी : प्रतिनिधी

ओबीसी, एससी, एसटींच्या आरक्षणाला धक्का न लावता महाराष्ट्रात मराठा,  गुजरातमध्ये पटेल, पाटीदार  तसेच जाट, राजपूत समाजाला आरक्षण मिळायला हवे. यासाठी सध्या   असलेली आरक्षणाची टक्केवारी वाढवून 75 टक्क्यांवर न्यावी, असे  मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

मंत्री आठवले सध्या गोवा दौर्‍यावर असून पर्वरी येथे सचिवालयात त्यांनी येथील दोन्ही जिल्हाधिकारी तसेच अधिकार्‍यांबरोबर बैठक घेऊन राज्यातील एससी, एसटी, ओबीसींविषयी माहिती घेतली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले की, आरक्षण 50 टक्क्यांवर  जाऊ नये, असा आदेश  सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी संसदेत कायदा संमत करून आरक्षण वाढविणे शक्य आहे. 

वार्षिक 8 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या म्हणजेच क्रिमिलेअरमध्ये न मोडणार्‍या मराठ्यांना आरक्षण देण्यास हरकत नाही, असे सांगून ते म्हणाले की, गेल्या निवडणुकीत गुजरात राज्यातील पाटीदार समाज काँग्रेसकडे गेला. त्यांना आरक्षण हवे असेल तर  येत्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडे यायला हवे. केंद्रातील ओबीसी आयोगाला अद्याप घटनात्मक दर्जा मिळालेला नाही, त्यामुळे या आयोगाला पुरेसे अधिकारही नाहीत. येत्या 5 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत होणार्‍या संसदीय अधिवेशनात कायदा दुरुस्ती करून आवश्यक तो दर्जा तसेच पुरेसे अधिकारही आयोगाला बहाल केले जातील. त्यामुळे अनेक प्रश्‍न मार्गी लागतील, असे आठवले यांनी सांगितले.