Wed, Apr 24, 2019 20:04होमपेज › Goa › साखळी पालिकेसाठी विक्रमी ८५ टक्के मतदान 

साखळी पालिकेसाठी विक्रमी ८५ टक्के मतदान 

Published On: May 07 2018 2:01AM | Last Updated: May 07 2018 12:48AMडिचोली : प्रतिनिधी 

साखळी नगरपालिका निवडणुकीसाठी रविवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान करून एकूण 85.05 टक्के मतदानाची नोंद झाली. प्रभाग क्र.13 मध्ये विक्रमी 98 टक्के तर प्रभाग क्र.12 मध्ये 94 टक्के  मतदान झाले असून त्याचा लाभ  कुणाला होणार याबद्दल कमालीची उत्सुकता आहे. एकूण नऊ विद्यमान नगरसेवक व आजी-माजी नगरसेवकांसह 55 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून सोमवारी (दि.7) मतमोजणी होणार आहे. 

डिचोलीचे उपजिल्हाधिकारी तथा निर्वाचन अधिकार प्रदीप नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार मतदान प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडली. सोमवारी सकाळी 8 वाजता  झांट्ये जिमखाना सभागृह वाठादेव येथे मतमोजणी होणार असून एकूण 13 टेबल्स घालून एकाचवेळी सर्व प्रभागांतील मतमोजणी हाती घेतली  जाणार आहे, त्यामुळे सर्व निकाल  तासाभरात हाती येतील, अशी माहिती  देण्यात आली.

सर्व तेराही  मतदान केंद्रांवर अनेक ठिकाणी सुरळीत मतदान सुरु होते. काही ठिकाणी गर्दी दिसून आली, तर काही पालक आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन खास मतदान करण्यासाठी  आले होते. काही  ठिकाणी ज्येष्ठ नागरिकही इतरांच्या मदतीने मतदान केंद्रावर मतदानासाठी उत्साहाने आले होते.

एकूण मतदार संख्या 8,112 असून पुरुष 4,013 व महिला 4,099 आहेत. प्रत्येक प्रभागात अंदाजे  625 च्या आसपास मतदार आहेत.निवडणूक यंत्रणा सज्ज असून प्रत्येक केंद्रावर पाच ते सहा कर्मचारी व पोलिस नियुक्त केले होते. सुमारे 80 सरकारी कर्मचारी या निवडणुकीत कार्यरत होते.

मतदानासाठी   मतदारांना  चुरशीने  मतदान केंद्राकडे आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोर लावल्याने 85 पर्यंत टक्केवारी वाढली. दुपारी 2 वाजेपर्यंत 62 टक्के मतदान झाले होते. लग्न सोहळे असूनही मतदारांनी मतदानात सहभाग घेतल्यामुळे अनेक उमेदवार निकाल काय लागणार याकडे लक्ष ठेवून आहेत.

एकूण तेरा प्रभागांतील लढती रंगतदार होणार असून 32 पुरुष व 23 महिला रिंगणात आहेत. विद्यमान नगराध्यक्ष धर्मेश सगलानी यांच्यासह   माजी नगराध्यक्ष आनंद नाईक, तसेच नगरसेविका निशा पोकळे व नगरसेविका रश्मी देसाई आमने-सामने आहेत. कुंदा माडकर, उपेंद्र कर्पे, ब्रम्हानंद देसाई, विभा देसाई, नारायण रेळेकर, दामोदर घाडी, दयानंद बोर्येकर, यशवंत माडकर, आरती नाईक आदींच्या थेट लढती आहेत.

आमदार डॉ. प्रमोद सावंत पॅनलचे उमेदवार विजयी होणार की, धर्मेश सगलानी यांच्या पॅनलचे उमेदवार आघाडी घेणार याबद्दल कमालीची उत्सुकता असून प्रत्येक मताचे गणित मांडले गेल्याने चुरशीचे दर्शन निवडणुकीवेळी दिसून आले.