Sun, Apr 21, 2019 13:45होमपेज › Goa › राज्यात ‘मान्सूनपूर्व’पावसाच्या तुरळक सरी

राज्यात ‘मान्सूनपूर्व’पावसाच्या तुरळक सरी

Published On: Jun 04 2018 1:37AM | Last Updated: Jun 04 2018 1:35AMपणजी : प्रतिनिधी 

राज्यभरात  शनिवारी रात्री विविध ठिकाणी  मान्सूनपूर्व  पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. पुढील दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. येत्या 5, 6 व  7 जून रोजी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने  वर्तवली आहे. 

राज्यभरात रविवारी  सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारनंतर तुरळक  सरी कोसळू लागल्या. काही ठिकाणी केवळ ढगांचा गडगडाट होत होता तर डिचोलीसह काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. पणजीसह अनेक ठिकाणी दिवसभरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.

राज्यातील तापमानात घट झाली असून हवेत गारवा पसरला आहे. गेल्या 24 तासांत कमाल तापमान 34  अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस इतके आहे. येत्या 48 तासांत तापमानात घट होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. वातावरणात 95 टक्के आर्द्रता आहे. वेधशाळेकडून 7 जूनपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात गेल्या 24 तासांत पणजीत सर्वाधिक 34 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.