Thu, Jul 18, 2019 21:09होमपेज › Goa › सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणार्‍यांवर दखलपात्र गुन्हा 

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणार्‍यांवर दखलपात्र गुन्हा 

Published On: Jan 05 2018 1:06AM | Last Updated: Jan 04 2018 11:14PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

गोव्यात उघड्यावर  मद्यपानकरणे हा आतापर्यंत दखलपात्र गुन्हा नव्हता, पण येत्या महिन्यापासून हा दखलपात्र गुन्हा ठरवला जाईल व कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईही होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. हिरा पेट्रोलपंपनजीक आयोजित कचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. उपसभापती मायकल लोबो, ईडीसी अध्यक्ष सिध्दार्थ कुंकळ्येकर, नगसेविका वैदेही नाईक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, सरकारने यापूर्वीच अबकारी कायद्यात दुरुस्ती केली आहे, मात्र ती दुरुस्ती अधिसूचित करण्यात आली नव्हती. आता लवकरच उघड्यावर मद्यप्राशनाविरोधासंबंधीची अधिसूचना जारी केली जाईल. त्यासाठीचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू असून जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात  ही तरतूद लागू होईल. सार्वजनिक ठिकाणी लोकांना त्रास होईल, अशा प्रकारे उघड्यावर मद्यपान करणे हा दखलपात्र गुन्हा ठरेल.

मुख्यमंत्री म्हणाले, विवाह सोहळा किंवा अन्य एखाद्या सोहळ्याप्रसंगी जर कुणी उघड्यावर मद्य पित असेल तर तिथे कारवाई केली जाणार नाही. कारण अशा सोहळ्यांना परवानगी असते; अन्यवेळी मात्र कारवाई होईल. पर्यटक आणि अन्य घटकांनी त्यासाठी सरकारला सहकार्य करावे. हॉटेलच्या खोल्यांमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये वगैरे बसून पर्यटकांनी मद्य प्यावे, पण उघड्यावर मद्यपान करू नये. अबकारी कायद्यातील नव्या तरतुदीचे पालन करावे एवढी पर्यटकांकडून सरकारची अपेक्षा आहे. दारूच्या बाटल्या कुठेही फेकताना किंवा अन्य कचरा रस्त्याच्या बाजूने टाकताना कुणी पर्यटक किंवा स्थानिक आढळले तर लगेच कारवाई केली जाईल. 

26 जानेवारीपासून प्लास्टिकबंदी

गोव्यात प्लास्टिक बंदीही येत्या 26 जानेवारीपासून लागू होणार आहे. रस्त्याच्या कडेला जर ट्रकांमधून आणून कुणीही कचरा टाकला तर तो ट्रक सरकारी यंत्रणा जप्त करील. महामार्गालगत आणून टाकला गेलेला 4200 टन कचरा गेल्या काही महिन्यांत सरकारी यंत्रणांनी गोळा केला. जर हा कचरा न उचलता तसाच महामार्गाच्या बाजूने राहू दिला असता तर पर्यटकांनी गोव्याकडे येणे टाळले असते, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 30 मे पासून गोव्यात पूर्णपणे प्लास्टिक बंदी असेल.