Fri, Apr 19, 2019 12:35होमपेज › Goa › सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, स्वयंपाकाला बंदी

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, स्वयंपाकाला बंदी

Published On: Jul 24 2018 1:33AM | Last Updated: Jul 24 2018 1:33AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात प्लास्टिकच्या वापरावर बंदी, रस्त्यावर कचरा टाकण्यास बंदी,   सार्वजनिक ठिकाणी  स्वयंपाक अथवा मद्यपान करण्यावर बंदी घातली जाणार आहे. यासाठी याच अधिवेशनात कायद्यात दुरुस्ती केली जाईल, अशी माहिती अर्थसंकल्पातील अनुदानित मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिली.  

पर्रीकर म्हणाले की, घनकचरा व्यवस्थापन कायद्याखाली पोलिसांनी या वर्षात 9602 प्रकरणांची नोंद केली आहे. रस्त्यावर अथवा नदीत कचरा टाकणार्‍यांवर कारवाईसाठी सध्या असलेला 100 रुपयांचा दंड वाढवून एक हजार ते दोन हजार रुपये केला जाणार आहे. यासंबंधी याच पावसाळी अधिवेशनात कायद्यात दुरुस्ती विधेयक येणार आहे. साळगाव कचरा प्रकल्पाची क्षमता 250 टनापर्यंत वाढवली जाणार असून वेर्णा व बायंगिणी येथे नवे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. गत सहा महिन्यांत भाडेकरूंची माहिती न देणार्‍या सुमारे 67 हजार प्रकरणांची नोंद पोलिस खात्यात करण्यात आली आहे. भाडेकरूंना शौचालय, प्रसाधनगृह देण्यासोबत ओळखपत्र घेण्याचेही घरमालकांना बंधनकारक करण्यात येणार आहे. यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाणार असून पोलिस घरमालकांवर एफआयआर दाखल करू शकणार आहेत. घरमालकांनी या बाबींची कार्यवाही न केल्यास त्यांना 2500 ते 10 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असून अशा गुन्ह्यांच्या तिसर्‍यावेळी घरमालकाला तुरूंगवासही सोसावा लागेल, असा इशारा पर्रीकर यांनी दिला. 

कपात मागणीवर उत्तर देताना पर्रीकर म्हणाले की, गतसाली गुन्हे शोधण्याची टक्केवारी 81.58 होती, ती  आता 85.65 झाली आहे. ड्रग्ज प्रकरणी आमदारांनी माहिती दिल्यास त्यावर अमली पदार्थ विरोधी विभागाकडून तात्काळ कारवाई केली जाणार आहे. ड्रग्ज पकडण्याबाबत गतसाली 39 प्रकरणांची नोंद झाली असली तरी यंदाच्या वर्षाच्या सहा महिन्यांत 106 प्रकरणे नोंद झाली आहेत. राज्यातील महिला, बालक आणि वेश्याव्यवसाय यांच्याबद्दलच्या प्रकरणांबाबत आपण संवेदनशील असून त्यांच्याविरूद्ध हयगय आपण सहन करणार नाही. वाहन अपघातात मृत्यू होणार्‍यांच्या संख्येत,  गतसालच्या (157) तुलनेत जूनपर्यंतच्या कालावधीत 22 टक्के (122) घसरण झाली आहे. 
दक्षता खात्यात तपासकामाचा वेग वाढला असून त्याचे मनुष्यबळ वाढवण्यात येणार आहे. पोलिस व वन खात्यात हवालदार पदांसाठी होमगार्डना 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार असून त्यांना वयाची व शारीरिक क्षमतेची अटही शिथील केली जाणार आहे. 

याशिवाय, वाहतूक नियम आणखी कडक करताना रस्त्यावरील वाहतूक पोलिसांना दंडाबाबत वादविवाद घातल्यास ड्युटी बजावताना अडथळा आणल्याबद्दल अतिरिक्त गुन्हा दाखल करण्याची मुभा पोलिंसांना देण्यात आली आहे. कोणाचीही शिफारसीसाठी फोन न घेण्याची सूचना वाहतूक पोलिसांना करण्यात आली असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.

मुंबईत गोवा भवनाचे काम सुरू झाले असून 40 टक्क्यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे. येत्या डिसेंबरपर्यंत सदर भवन खुले केले जाणार आहे. दाबोळी विमानतळावर कार पार्किंग इमारतीचे काम सुरू होणार आहे. मोपा विमानतळाच्या कंत्राटदाराकडून 36.99 टक्के महसूल राज्य सरकारला प्राप्त होणार असून विमानतळातून राज्य सरकारला मिळणारा हा देशातील सर्वाधिक महसूल ठरणार आहे. इफ्फी-2019 दोनापावला येथील कन्व्हेेन्शन सेंटरमध्येच आयोजित केला जाणार असल्याचेही पर्रीकर यांनी नमूद केले.