Thu, Jul 18, 2019 06:36होमपेज › Goa › खाण अवलंबितांची आज पणजीत धडक

खाण अवलंबितांची आज पणजीत धडक

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 19 2018 1:46AMपणजी : प्रतिनिधी

खाणबंदीच्या निषेधार्थ खाण अवलंबितांनी शक्‍तिप्रदर्शनाची जोरदार तयारी चालवली असून पणजीतील नियोजित धडक मोर्चामुळे सर्व शहरातील व्यवहार ठप्प होऊन सोमवारी मेगाब्लॉक होईल, या शक्यतेने प्रशासन जनजीवन सुरळीत रहावे यासाठी सज्ज झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने पणजीतील मांडवी पूल व कदंब बसस्थानक परिसरात सकाळी 6 ते 10.30 वाजण्याच्या कालावधीत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. 

नियोजित आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी रात्री उशिरापर्यंत ट्रकमालक, प्रशासकीय अधिकारी, पोलिस प्रशासनाची धावपळ सुरू होती. जिल्हाधिकारी निला मोहनन यांची ट्रक मालकांसोबत संध्याकाळी बैठक झाली. राज्यात बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी अडचणी येऊ नयेत, यासाठी  ट्रकमालकांनी विचार करावा, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. त्यावर परीक्षेसाठी वेळेत पोहोचण्याची जबाबदारी  स्वत:वर घेतलेली नाही. 

राज्यात खाणबंदीच्या निषेधार्थ विविध खाणपट्ट्यांतील खाण अवलंबित आज, सोमवारी सकाळी आझाद मैदानावर मोर्चाने एकत्र येणार आहेत. पणजीतील कदंब बसस्थानक सर्कल, मालीम जेटी, मेरशी जंक्शन व क्रांती सर्कल या ठिकाणांवर नियोजित मोर्चाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येईल. या पार्श्‍वभूमीवर सामान्य नागरिक व दुचाकीस्वारांची गैरसोय  होऊ नये, यासाठी वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत. 

वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी  पादचार्‍यांनी  कदंब बसस्थानक सर्कलकडे जाणे किंवा तेथून येणे टाळावे. वाहतूक खेाळंबा टाळण्यासाठी गोमेकॉ किंवा मणिपाल हॉस्पिटलकडे किंवा उत्तर गोव्यातून पणजी शहरात येणार्‍या प्रवाशांनी जुना मांडवी पूल व क्रांती सर्कल या मार्गाने यावे. दक्षिण गोव्यातून पणजी शहरात येणार्‍यांनी गोमेकॉ-गोवा विद्यापीठ-दोनापावल व मिरामार मार्गाने शहरात यावे. विमानतळ किंवा रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या प्रवाशांनी वेळेत पोहोचण्यासाठी सकाळी किमान एक तास लवकर बाहेर पडावे. सामान्य वाहनांना मोर्चाचा त्रास होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी आवश्यक व्यवस्था केली असून तरीही विलंब टाळण्यासाठी लोकांनी घरातून लवकर बाहेर पडावे, तसेच वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.