Mon, May 27, 2019 01:20होमपेज › Goa › चांदरमधून जाणारा प्रस्तावित महामार्ग रद्द

चांदरमधून जाणारा प्रस्तावित महामार्ग रद्द

Published On: Aug 18 2018 1:00AM | Last Updated: Aug 18 2018 12:00AMपणजी : प्रतिनिधी

दक्षिण गोव्यातील चांदर गावातून जाणारा प्रस्तावित राज्य महामार्ग क्रमांक-8 रद्द करण्यात येणार असून त्यासंबंधी काढण्यात आलेली अधिसूचना रद्द केली जाणार असल्याचे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई  यांनी सांगितले.

नगरनियोजन मंडळाची 163 वी बैठक पणजीत घेण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना सरदेसाई बोलत होते. ते म्हणाले की, चांदर हे राज्यातील एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचे वारसास्थळ असून प्रादेशिक आराखडा-2021 मध्ये राज्य महामार्ग क्रमांक-8 या गावातून जाणार असल्याचे दाखवण्यात आले होते. सदर अधिसूचनेला अनेक स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमी तसेच  विरोधी पक्षाने आक्षेप घेतला होता. या नाराजीची दखल घेऊन सदर महामार्ग रद्द करण्याचे खात्याच्या बैठकीत ठरविण्यात आले. स्थानिकांनी तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने या महामार्गाला पर्यायी मार्ग सूचवला असून त्यावर दुसर्‍या बैठकीत विचारविनिमय केला जाणार आहे.

मंडळाच्या बैठकीत उत्तर गोवा पीडीएला पणजी आणि म्हापसा शहराचा तसेच मुरगाव पीडीएला वास्को शहराचा नवा बाह्यविकास आराखडा (ओडीपी) तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

विधानसभा अधिवेशनात आपण ओडीपी बनवताना सर्वत्र समान प्रणालीचा वापर करण्याचे आश्‍वासन दिले होते. ही प्रक्रिया दक्षिण गोवा पीडीएने अवलंबली असली तरी अन्य पीडीएकडून ती अंमलात आणली गेली नव्हती. यासाठी सर्व पीडीएमध्ये  समानता आणण्यासाठी ही दुरुस्ती करण्यात आल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.