Mon, Jun 24, 2019 21:58होमपेज › Goa › फोंडा  उपजिल्हा इस्पितळ परिसरात दुर्गंधी

फोंडा  उपजिल्हा इस्पितळ परिसरात दुर्गंधी

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 07 2017 11:58PM

बुकमार्क करा

फोंडा : वार्ताहर

फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दूषित पाण्याचा चेंबर भरून प्रवेश द्वाराच्या रस्त्यावरून  वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. गेल्या 5-6 दिवसांत सदर प्रकाराकडे कुणीच लक्ष दिले नसल्याने रूग्णांबरोबर येणार्‍या नातेवाईकांचे हाल होत असून. त्यात त्यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी इस्पितळात भेट देऊन समस्यांचे निवारण करण्याची मागणी लोकांतून होत आहे.

काही दिवसांपासून उपजिल्हा इस्पितळाच्या प्रवेशद्वारातून दूषित पाणी वाहत असल्याने रूग्णांना त्या पाण्यातूनच इस्पितळात प्रवेश करावा लागत आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने रूग्णांना नाकावर रूमाल पकडून इस्पितळात जावे लागत आहे. इस्पितळातील शवागराजवळही चेंबर तुंबल्याने दुर्गंधीमय स्थिती निर्माण झाली आहे. या संबंधी अधिक माहितीसाठी प्रयत्न केला असता इस्पितळाचे अधीक्षकांशी संपर्क होऊ शकला नाही.

फोंड्यातील समाजसेवक विराज सप्रे यांनी सांगितले, की इस्पितळातील या समस्येकडे संबंधित व आरोग्य खात्याने गांभीर्याने लक्ष घालून परिसर स्वच्छ ठेवण्याची  गरज  आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून इस्पितळासमोर दुर्गंधीमय वातावरण होत आहे. यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्र्यांनी स्वत: इस्पितळास भेट देवून पाहणी करावी. तसेच सामान्य नागरिक व रूग्णांचे होणारे हाल थांबवावे.

आमदार रवी नाईक यांनी सांगितले, की उपजिल्हा इस्पितळातील सद्या मलनिस्सारण यंत्रणा व्यवस्थित नसल्याचे दिसून येते. त्यामुळे लोकांचे आरोग्य अधिक बिघडण्याची शक्यता आहे. या संबंधी आरोग्य खात्याकडे अनेक वेळा पत्र पाठवून समस्या दूर करण्याची मागणी केली आहे. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने सद्या इस्पितळाची स्थिती बिकट झाली आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार इस्पितळाचे अधीक्षक व  प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्याधिकार्‍यांनी बांधकाम  खात्याला कळवूनही दुरूस्तीचे काम केले नाही. त्यामुळे वाहिन्या तुंबल्याने चेंबरमधून दूषित पाणी सद्या रस्त्यावरून जात आहे.