Sat, Jul 20, 2019 09:06होमपेज › Goa › राष्ट्रपतींची जुने गोवे चर्च, मंगेशी मंदिराला भेट

राष्ट्रपतींची जुने गोवे चर्च, मंगेशी मंदिराला भेट

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 1:01AMपणजी : प्रतिनिधी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांनी रविवारी जुने गोवे येथील ‘बासिलिका ऑफ बॉम जीझस’ चर्च आणि मंगेशी येथील श्री मंगेश मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यावेळी त्यांच्यासमवेत होत्या. राष्ट्रपती कोविंद आयएनएस हंसा दाबोळी विमानतळावरून रविवारी संध्याकाळी दिल्‍लीला रवाना झाले.

जुने गोवे चर्चचे रेक्टर फादर पॅट्रिसियो फर्नांडिस यांनी ‘बासिलिका ऑफ बॉम जीझस’ चर्च येथे राष्ट्रपतींचे स्वागत केले.  फादर फर्नांडिस यांनी राष्ट्रपतींना चर्चच्या इतिहासाची माहिती दिली. आपण या चर्चला याआधीही दोनवेळा भेट दिली असून आपल्याला आत्मिक समाधान मिळाले, असे कोविंद यांनी विधान केले असल्याचे फा. फर्नांडिस यांनी पत्रकारांना सांगितले.

जुने गोवे चर्च परिसरात सुमारे 20 मिनिटे थांबून राष्ट्रपतींनी इतर मान्यवरांसोबत मंगेशी फोंडा येथील श्री मंगेश मंदिरास भेट दिली.  कला व संस्कृती मंत्री  गोविंद गावडे आणि गृह खात्याच्या सचिव  अंजली सेहरावत यांनी त्यांचे स्वागत केले.  मंदिरास भेट दिल्यानंतर मंदिराच्या पदाधिकार्‍यांनी राष्ट्रपतींना मंदिराच्या उत्सवांची आणि रीतीरिवाजांची माहिती दिली.  दोन्ही ठिकाणी राष्ट्रपतींना स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.

राष्ट्रपती कोविंद गोव्यातील दोन दिवसांच्या भेटीनंतर आयएनएस हंसा दाबोळी विमानतळावरून रविवारी संध्याकाळी दिल्‍लीला रवाना झाले. यावेळी गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, राजशिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो, मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, पोलीस महासंचालक डॉ. मुक्‍तेश चंदर आणि रिअर अ‍ॅडमिरल हेमंत पडबिद्री व राजशिष्टाचार सचिव  डब्ल्यू. व्ही. रमणमूर्ती यांनी त्यांना निरोप दिला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाचे न्या. एन. जमादार, न्या. सी. व्ही. भडंग, न्या. नूतन सरदेसाई, न्या. पृथ्वीराज  चव्हाण आणि अन्य वरिष्ठ न्यायमूर्तींनी राष्ट्रपती कोविंद यांची  रविवारी भेट घेतली. राष्ट्रपतींनी दोनापावला राजभवन परिसरात वृक्षारोपणही केले.