Sun, Mar 24, 2019 08:52होमपेज › Goa › परिचारिकांचे भरती धोरण बदलण्यासाठी प्रयत्न

परिचारिकांचे भरती धोरण बदलण्यासाठी प्रयत्न

Published On: Jul 09 2018 1:01AM | Last Updated: Jul 09 2018 1:01AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील परिचारिकांच्या अनेकदा अनियंत्रित बदल्या केल्या जातात. यामुळे परिचारिकांच्या कामावर व सेवेवर परिणाम होतो. परिचारिकांच्या भरती व बदल्या करणार्‍या अधिकार्‍यांकडे यासंदर्भात चर्चा केली जाईल. सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही, त्याची काळजी घेऊन परिचारिकांचे भरती धोरण बदलण्यासाठी आपण प्रयत्न करणार, असे आश्‍वासन आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी दिले.  

 
भारतीय प्रशिक्षित परिचारिका संघटनेतर्फे रविवारी इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रगांझा सभागृहात आयोजित ‘सृजन सांज’ कार्यक्रमात मंत्री विश्‍वजित राणे बोलत होते. व्यासपीठावर परिचारिका शिक्षण संस्थेच्या प्राचार्य कॅरोल नोरोन्हा, संघटनेच्या अध्यक्षा कुंतल केरकर, सचिव रुबिना फर्नांडिस उपस्थित होत्या. मंत्री राणे यांच्या हस्ते संघटनेच्या नवीन वेबसाईटचे लाँचिंग करण्यात आले. 

मंत्री राणे म्हणाले, की रोज वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांच्या बदल्यांसंदर्भात कागदपत्रे येत असतात. यावर तोडगा काढणे महत्त्वाचे आहे. राज्यातील परिचारिकांना सोयीचे व राहत्या ठिकाणावरून जवळ असलेल्या इस्पितळात काम मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. परिचारिकांच्या अन्य समस्यांचाही गांभीर्गाने अभ्यास करून उपाय काढला जाईल. 

‘सृजन सांज’ मध्ये केरकर यांनी स्वागत केले.

केरकर म्हणाल्या, की नवीन वेबसाईटमुळे संघटनेच्या कार्याविषयी सर्वांना वेळोवेळी माहिती मिळणार आहे. राज्यातील परिचारिकांना त्यांच्या मागणीनुसार नवीन प्रकारचा गणवेश देण्यात आला आहे. परिचारिकांच्या हुद्याप्रमाणे 1 ऑगस्ट पासून सर्व परिचारिकांना हा गणवेश लागू केला जाणार आहे.

कार्यक्रमात मंत्री राणे यांच्याहस्ते गेल्या 35 ते 38 वर्षांसाठी यशस्वी सेवा बजाविलेल्या माजी परिचारिकांचा सन्मान करण्यात आला.