Wed, Mar 20, 2019 13:00होमपेज › Goa › पेडणे महत्त्वाचे रेल्वे स्थानक : श्रीपाद नाईक

पेडणे महत्त्वाचे रेल्वे स्थानक : श्रीपाद नाईक

Published On: Mar 03 2018 1:50AM | Last Updated: Mar 02 2018 11:46PMपेडणे : प्रतिनिधी

पेडणे हे गोव्यातील पहिले व महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे; ते उत्तमच असायला हवे, असे केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी सांगितले. पेडणे रेल्वे स्थानकात करण्यात आलेल्या विकासकामांचे आज उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. श्रीपाद नाईक पुढे म्हणाले की, राजकारणामुळे पेडण्याचा विकास मागे पडला आहे.

नुकताच आणखी 58 लाखाचा निधी पेडणे रेल्वे स्थानकासाठी मंजूर केला असून यापुढेही आवश्यक खर्चाची रक्कम खासदार निधीतून देण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. परंतु, आता पेडण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, अशी भावना नाईक यांनी व्यक्त केली. यापूर्वीही अनेक विकास प्रकल्प करताना पेडणे ग्रामपंचायत, बांधकाम विभाग, सर्व आमदार , नागरिक यांनी कायमच सहकार्य केले असल्याचेही नाईक यांनी यावेळी नमूद केले. पेडणे ग्रामस्थांनी कामाचे कायम कौतुक केल्याबद्दल नाईक यांनी आनंद व्यक्त केला. हे प्रकल्प स्थानिकांच्या मागणीनुसार करण्यात आले आहेत.

खासदार निधीचा कायम योग्य ठिकाणी वापर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. आजपर्यंत 80 पेक्षा जास्त कम्युनिटी सभागृह व 70 पेक्षा जास्त स्मशानभूमीची कामे करण्यात आली आहेत, अशी माहिती नाईक यांनी दिली. येत्या एका वर्षात 1000 प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस असल्याचे नाईक यांनी सांगितले. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे देखील पेडण्याचा विकास निश्‍चितच होईल. रोजगार निर्मिती होईल, अशी आशा नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केली. आपल्या भाषणात नाईक यांनी कोकण रेल्वे अधिकार्‍यांना पेडणे रेल्वे स्थानकावर अधिकाधिक सुविधा नागरिकांसाठी प्रदान कराव्यात अशी विनंती केली.