होमपेज › Goa › ‘शाळा दर्पण’द्वारे पाल्याच्या वर्तनाची माहिती

‘शाळा दर्पण’द्वारे पाल्याच्या वर्तनाची माहिती

Published On: Jan 06 2018 1:47AM | Last Updated: Jan 06 2018 1:45AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

आपली मुले शाळेत अभ्यास करतात, की खेळात वेळ घालवतात, याची चिंता असलेल्या पालकांना आता दिलासा मिळणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची मधली सुट्टी, माध्यान्ह आहार तसेच शाळेतील कार्यक्रम, क्रीडा, परीक्षा, निकाल, नोटीस, सूचना या सर्वांची माहिती पालकांना घरबसल्या ‘शाळा दर्पण’ या अ‍ॅपद्वारे मोबाईलवर येत्या शैक्षणिक वर्षापासून मिळणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी दिली. 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेंतर्गत शालेय दैनंदिनीचेही ‘डिजिटलायझेशन’ करण्यास प्रारंभ केला आहे. सर्व शिक्षा मोहिमेंंतर्गत ‘शाळा दर्पण’ ही योजना राबवण्यात येत असून त्याद्वारे राज्यातील सर्व माध्यमिक विद्यालयांतील दैनंदिन उपक्रम हे डिजिटलाईझ करण्यात येतील. सर्व विद्यालयांना ‘शाळा दर्पण’ नावाचे एक विशिष्ट ‘सॉफ्टवेअर’ दिले जाणार आहे. देशात सर्वप्रथम राजस्थानमध्ये या अ‍ॅपचा प्रायोगिक तत्वावर केलेला वापर अत्यंत यशस्वी झाला होता.  सकाळी प्रार्थनेला सुरुवात झाल्यापासून मधली सुट्टी ते दुपारी शाळा सुटेपर्यंतच्या सर्व घटनाक्रमाची माहिती त्यावर अपलोड केली जाईल.  येत्या शैक्षणिक वर्षापासून ही योजना सुरू करण्याचा खात्याचा संकल्प     


असल्याचे भट यांनी सांगितले. 

विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर नेमके काय करतो याची सूचना प्रत्येक तासिकेला पालकांना घरबसल्या मिळणार आहे. ‘शाळा दर्पण’ या नवीन अँड्रॉईड अ‍ॅपच्या सहाय्याने ही योजना राज्यातील सर्व माध्यमिक विद्यालयांना लागू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहितीही थेट पालकांना मिळणार असल्याचे भट  यांनी सांगितले. 

पालक-शिक्षक संवादालाही त्यात वाव आहे. सरकारी माध्यमिक शाळा आणि अनुदानित खासगी माध्यमिक शाळांनाही ही प्रणाली बसविणे सक्तीचे आहे. पालकांना केवळ आपला मुलगा किंवा मुलगी ज्या शाळेत आहे त्याच शाळेतील माहिती मिळेल. ही माहिती ठराविक वेळात अपलोड करण्याची यंत्रणाही शाळेकडूनच उभारावी लागेल. शिक्षण खात्यालाही याची माहिती आपोआप मिळेल अशी व्यवस्थाही त्यात आहे. संपूर्ण प्रकल्पाचे संचालन हे शिक्षण खाते ‘एनआयसी’च्या मदतीने करणार आहे, असे भट यांनी सांगितले.‘शाळा दर्पण’ अ‍ॅप राजस्थानात 10 हजारहून अधिक लोकांनी डाऊनलोडही केले आहे. देशपातळीवर हा प्रयोग राबविण्याचा निर्णय केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे.