Sun, May 26, 2019 08:55होमपेज › Goa › ‘मांडवी-झुआरी’चा होणार पर्यावरणीय अभ्यास

‘मांडवी-झुआरी’चा होणार पर्यावरणीय अभ्यास

Published On: Jan 06 2018 1:50AM | Last Updated: Jan 06 2018 1:50AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

गोव्यातील मांडवी आणि झुआरी या दोन प्रमुख नद्यांचा पर्यावरणीय परिणाम अभ्यास  (ईआयए) केला जाणार आहे. राज्यातील सहाही नद्यांच्या विकासाबाबत राष्ट्रीय अंतर्गत जलवाहतूक प्राधिकरण (आयडब्लूएआय), मुरगाव पतन न्यास (एमपीटी) आणि बंदर कप्तान विभाग यांच्यात होणार्‍या त्रिपक्षीय सामंजस्य कराराच्या मसुद्यात नद्यांचा पर्यावरण अभ्यासही गरजेचा ठरवण्यात आला आहे. या करारानंतर लगेच नद्यांच्या अभ्यासाचे काम हाती घेतले जाणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. 

पर्यावरणीय परिणाम अभ्यासाचा खर्च ‘आयडब्लूएआय’ उचलणार आहे. सरकारने पर्यावरणीय परिणाम अभ्यासाकरिता दोनापावला येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेकडे (एनआयओ) संपर्क साधला असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. 

राज्यातील मांडवी आणि झुआरी या दोन नद्यांसह शापोरा, साळ, म्हापसा व कुंभारजुवे या सहा नद्यांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून दर्जा मिळणार असून त्यासाठी या नद्यांचा विकास राज्य सरकारने केंद्राच्या साहाय्याने करण्याचे निश्‍चित केले आहे. या विकासकामाचा मसुदा नुकताच मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हिवाळी अधिवेशनात मांडला होता. येत्या तीन आठवड्यांत सदर त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षर्‍या होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मांडवी आणि झुआरीच्या बाबतीत जैवविविधतेबद्दल सर्वात आधी पर्यावरणीय परिणाम अभ्यास होणार असून त्यानंतर अन्य चार नद्यांचाही असाच अभ्यास केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले. 
राज्य सरकारच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व नद्यांवर राज्य सरकारचाच अधिकार कायम राहणार आहे. यामध्ये नद्यातील पाणी, नद्यांचा तळ व काठ, त्यावरील विद्यमान साधनसुविधा आदींवरील हक्क बंदर कप्तान खात्याकडे राहणार असल्याचे सदर कराराच्या मसुद्यात नमूद करण्यात आले आहे. 

राज्यातील अनेक नद्यांमध्ये साचलेल्या गाळामुळे खनिज वाहतूक करणार्‍या बार्जेस तसेच प्रवासी वाहतूक करणार्‍या फेरीबोटीही अडकून पडत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या नद्यांमधील गाळ काढून खोली वाढवण्याचा आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या नद्यांमधील गाळ उपसल्यानंतर त्याची विल्हेवाट कुठे लावावी यासाठी जागेचा शोध घेतला जात आहे, असे सूत्रांनी सांगितले.