Wed, Mar 27, 2019 06:04होमपेज › Goa › ‘सेरेंडिपिटी’त सिमेंटच्या वस्तूंचे आकर्षण

‘सेरेंडिपिटी’त सिमेंटच्या वस्तूंचे आकर्षण

Published On: Dec 20 2017 1:39AM | Last Updated: Dec 19 2017 11:45PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गेल्या पाच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलेल्या सेरेंडिपिटी महोत्सवात आयनॉक्स परिसरात ‘क्राफ्ट बँटोन’ हे सिमेंट पासून बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरले आहे. सिमेंट पासून बनविलेल्या दैनंदिन कामासाठीच्या वस्तूंबरोबरच दागिने, फर्निचर, घरगुती उपयोगी वस्तूही प्रदर्शनात आहेत. सिंमेटचा बांधणीसाठीचा वापर बाजूला सारून ही एक अनोखी कल्पना समोर असल्याने लोक याकडे  आकर्षित होत आहेत. 

 प्रदर्शनातील वस्तू बनविण्याची संकल्पना ही प्रॉडक्ट डिजायनर अ‍ॅलन सागा, इती त्यागी, सिंथिया, सोमेश सिंग व मिरॉस्लॉ बाका यांची आहे. ‘रिथिंकिंग आर्ट’ या शीर्षकाखाली प्रदर्शन भरले आहे.
सिमेंटपासून बनविलेले मेणबत्ती स्टॅण्ड, आरसा लावण्याचे स्टॅण्ड,  ‘टॅग्लड रिफ्लॅक्शन’, पिरॅमिड, दागिने, टेबल, खुर्च्या,   पुस्तके ठेवायचे स्टॅण्ड, अंड्यांचे क्रेट   व अन्य सजावटीच्या वस्तू  आहेत. सिमेंटचा वापर बांधणीसाठी केला जातो. परंतु सिमेंट तेवढ्यापुरतेच मर्यादित नसून  इतर वस्तू देखील बनविल्या जाऊ शकतात याचे  उदाहरण प्रदर्शनातून दिसून येते. सिमेंटपासून बनलेल्या सुमारे 48 वस्तू  प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत.    

सेरेंडिपिटी महोत्सवात  मंगळवारी आदिल शहा पॅलेसमध्ये ‘बैठक’ या कार्यक्रमात गायत्री  गायकवाड यांचा गझल गायनाचा कार्यक्रम  झाला. तसेच ‘लुज युवर माइन्ड, युज युवर बॉडी’ या विषयावर कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती.