होमपेज › Goa › राज्य पोलिस दलात ४१ नवीन वाहने

राज्य पोलिस दलात ४१ नवीन वाहने

Published On: Dec 20 2017 1:39AM | Last Updated: Dec 19 2017 11:52PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गोवा पोलिस दलाच्या ताफ्यात 41 नवीन मारुती सुझुकी एरटीगा वाहने मंगळवारी (दि.19)दाखल झाली. पणजी येथील पोलिस मुख्यालय येथे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वाहनांना हिरवा झेंडा दाखवला.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, वाहतूक व्यवस्थापन व अन्य कामांंसाठी पोलिस खात्याला या वाहनांचा वापर करणे शक्य होईल. येत्या काही दिवसांत पोलिस खात्यासाठी 28 नव्या दुचाक्या खरेदी केल्या जातील. गोवा पोलिस सिटीझन पोर्टलमुळे लोकांमध्ये एफआयआर संदर्भात असलेल्या गैरसमजुती दूर होण्यास मदत होईल. एफआयआर नोंद करण्याची प्रक्रिया सोपी व सुटसुटीत करणे आवश्यक आहे. या पोर्टलमुळे लोक व पोलिसांमधील समन्वय वाढेल. 

क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्किंग सिस्टीम हा केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाचा प्रकल्प असून यासाठी गोवा सरकारला 7.04 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. या प्रकल्पासाठी राज्य सरकारने अतिरिक्त 6.52 कोटी रुपयांचा निधी दिला. या प्रकल्पामुळे गोवा पोलिसांना देशातील अन्य पोलिस स्थानकांशी संपर्क साधून माहितीची देवाण-घेवाण करणे शक्य होईल. गोवा पोलिस  प्रशाासन पेपरलेस होण्याच्या दिशेने प्रयत्न करीत आहे. या अंतर्गत नोंदी व तपासाची प्रक्रिया  डिजिटल केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

यावेळी मुख्य  सचिव धर्मेंद्र  शर्मा, पोलिस महासंचालक डॉ. मुक्तेश चंदर, पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग, चौगुले उद्योग समुहाच्या व्यवस्थापकीय संचालक पद्मा चौगुले व मान्यवर उपस्थित होते.