Tue, Aug 20, 2019 16:04होमपेज › Goa › पणजीत डॉक्टरांची रॅली 

पणजीत डॉक्टरांची रॅली 

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 03 2018 12:02AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयकाला विरोध करण्यासाठी मंगळवारी देशातील खासगी वैद्यकीय सेवांमधील डॉक्टरांनी पुकारलेल्या बंदच्या समर्थनार्थ गोव्यातील डॉक्टरांनी पणजीत रॅली काढली. दरम्यान, दुपारी आयएमएने देशव्यापी बंद मागे घेतल्याने  गोव्यातील वैद्यकीय सेवाही  दुपारी 3 वाजल्यानंतर पूर्ववत सुरू करण्यात आली. देशव्यापी बंदच्या समर्थनार्थ बंदमध्ये गोव्यातील 1300 डॉक्टर तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे 150 विद्यार्थी  सहभागी झाले होते. लोकसभेच्या स्थायी समितीकडे विचारार्थ सदर विधेयक पाठवण्यात आल्याने देशव्यापी बंद आयएमएने मागे घेतला आहे, अशी माहिती डॉ.शेखर साळकर यांनी दिली.

आयएमएचे  गोवा अध्यक्ष डॉ. अजय  पेडणेकर, खजिनदार डॉ. सर्वेश दुभाषी, डॉ. संदीप नाईक, डॉ. शेखर साळकर व अन्य   पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. पेडणेकर म्हणाले, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग विधेयक  वैद्यकीय क्षेत्रावर घाला घालणारे आहे. मेडिकल काऊंसिल ऑफ इंडिया कार्यरत असताना  राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची गरज नाही. मात्र, तरीदेखील केंद्र सरकारकडून ते लादले जात आहे.  या आयोगावर डॉक्टरांऐवजी बिगर  वैद्यकीय क्षेत्रातील तसेच राजकीय लोकांचे प्रतिनिधित्व राहणार असल्याने त्याला डॉक्टरांचा आक्षेप आहे. त्यानुसार  आझाद मैदानावर प्रस्तावित विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनांतर्गत या विधेयकाला विरोध करण्यासाठी खासगी वैद्यकीय सेवांमधील डॉक्टरांनी 12 तास बाह्यरुग्ण विभाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे, असे आयएमएने जाहीर केले होते.