Tue, Apr 23, 2019 19:37होमपेज › Goa › ३० मे पासून सक्त ‘प्लास्टिक बंदी’ 

३० मे पासून सक्त ‘प्लास्टिक बंदी’ 

Published On: Dec 20 2017 1:39AM | Last Updated: Dec 19 2017 11:59PM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

येत्या घटक राज्य दिनापासून (30 मे 2018) गोव्यात प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे.  यासाठी प्लास्टिक बंदी काटेकोरपणे लागू करण्यासाठी आवश्यक सर्व अधिसूचना 26 जानेवारीपर्यंत जारी केल्या जाणार आहेत, असे  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. पुढील मुक्तीदिनापूर्वी गोवा प्लास्टिकमुक्त करू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

पणजी येथील कांपाल मैदानावर आयोजित राज्यस्तरीय गोवा मुक्ती दिन सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. येत्या 30 मे नंतर पर्यावरणाला घातक अशा प्लास्टिक पिशव्यांवर तसेच अन्य काही प्लास्टिक उत्पादनांच्या वापरावर बंदी घातली जाणार आहे. या निर्णयामुळे प्लास्टिक वस्तूंच्या व्यवहारात ज्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले  आहेत, त्यांनी नंतर तक्रार करू नये म्हणून आगाऊ  कल्पना देत आहे. त्यांनी  पर्यायी सोयीसाठी आतापासूनच हालचाली कराव्यात, असेही  पर्रीकर यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री  म्हणाले,  सरकारने कचरा समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले असून पुढील गोवा मुक्ती दिनापूर्वी ‘स्वच्छ भारत, नितळ गोंय’ ही संकल्पना सत्यात उतरवली जाणार आहे. सरकारने कचरा व्यवस्थापन महामंडळ स्थापन करून त्याची सुरुवात केली आहे. साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असून राज्यात आणखी 3 प्रकल्प लवकरच उभारले जाणार आहेत. जनतेने नितळ गोंय अभियानात  सक्रिय साथ द्यावी.

कचरा निर्मूलनासाठी स्थानिक पंचायतींना वाढीव अनुदान दिले जाणार आहे. गोवा हे देशातील मुख्य पर्यटन केंद्र असून येथील स्वच्छतेवर आपण भर दिला पाहिजे. पर्यटन हे राज्याचा आर्थिक कणा असून आपण   सभोवतालचा परिसर आणि किनारे स्वच्छ ठेवले तरच अधिक पर्यटक राज्याला भेट देतील, असेही पर्रीकर म्हणाले. 

ध्वजारोहण केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रींकर यांनी   पोलिस दलाकडून मानवंदना स्वीकारली. त्यानंतर त्यांच्या हस्ते पोलिस, होमगार्ड, शेतकरी, समाजसेवक आदींचा    पदक आणि पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. राज्यातील विविध शाळा आणि बालभवनच्या विद्यार्थ्यांनी गोव्याची सांस्कृतिक महती सांगणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.