Sun, Jun 16, 2019 02:14



होमपेज › Goa › मल्टिप्लेक्समध्ये पोलिस बंदोबस्तात ‘पद्मावत’ प्रदर्शित

मल्टिप्लेक्समध्ये पोलिस बंदोबस्तात ‘पद्मावत’ प्रदर्शित

Published On: Jan 29 2018 12:28AM | Last Updated: Jan 29 2018 12:26AM



पणजी : प्रतिनिधी

वादाच्या भोवर्‍यात अडकलेला ‘पद्मावत’ चित्रपट अखेर रविवार (दि.28) पासून राज्यातील सर्व मल्टिप्लेक्स थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला. गोव्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सर्व थिएटर्समध्ये कडेकोट पोलिस संरक्षणात  रसिकांनी चित्रपटाचा आनंद घेतला. 

‘मल्टिप्लेक्स असोसिएशन’ने गोवा, मध्यप्रदेश, गुजरात  व राजस्थान या चार राज्यांमध्ये ‘पद्मावत’ चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सदर चित्रपटाला होत असलेला विरोध मावळला असल्याने ही बंदी मागे घेण्यात आली  आहे. राज्यातील आयनॉक्स, ओशिया कॉम्प्लेक्स आणि झेड-स्क्वेअर मल्टिप्लेक्समध्ये रविवारी सकाळी 9 वाजता ‘पद्मावत’चा पहिला शो दाखवण्यात आला. त्यानंतर हाच चित्रपट ‘3-डी’ स्वरूपात सकाळी 9.40 वा. पासून दाखवण्यात आला. ‘पद्मावत’ चित्रपटाच्या तिकीटांसाठी राज्यातील मल्टिप्लेक्सच्या तिकीट काऊंटर बाहेर प्रेक्षकांनी गर्दी केली होती. ‘पद्मावत’ स्क्रिनिंगवेळी  कायदा  व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी स्थानिक पोलिसांनी चित्रपटगृहांना संरक्षण दिलेे असल्याचे सूत्रांनी सांगितले.  याआधी गुरुवारी राज्यातील लहान चित्रपटगृहांत पोलिस संरक्षणात ‘पद्मावत’ प्रदर्शित करण्यात आला होता. आयनॉक्स व अन्य मल्टिप्लेक्समध्ये सदर चित्रपट प्रदर्शित  करण्यात आला नव्हता. मात्र, मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात आला नसल्याने रसिकांनी लहान थिएटर्सकडे आपला मोर्चा वळवला होता. 

आक्षेपार्ह काही नाही : रसिकांचे मत

चित्रपट रसिकांनी  ‘पद्मावत’ पाहिल्यानंतर त्यावर बंदी घालण्याजोगे आक्षेपार्ह असे काहीही नसल्याचे मत व्यक्‍त केले. शूर राजपूतांचा गौरवपूर्ण इतिहास ‘पद्मावत’मध्ये दाखवण्यात आला असून कलाकारांनी वाखाणण्याजोगे काम केले आहे, असे काही प्रेक्षकांनी सांगितले.