Tue, Jul 23, 2019 02:08होमपेज › Goa › ...अन्यथा गॅस पाईपलाईन खोदकामाची परवानगी रद्द :  महापौर सुरेंद्र फु र्तादो

...अन्यथा गॅस पाईपलाईन खोदकामाची परवानगी रद्द :  महापौर सुरेंद्र फु र्तादो

Published On: Jan 26 2018 1:21AM | Last Updated: Jan 25 2018 11:59PMपणजी : प्रतिनिधी

दोनापावल येथे  गॅस पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी संबंधित कंपनीने रस्ता खोदण्यासाठीचा उर्वरीत  शुल्क  मनपाकडे  येत्या आठ दिवसांत जमा न केल्यास त्यांना देण्यात आलेली परवानगी रद्द केली जाईल, असा इशारा महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी गुरुवारी मनपाच्या बैठकीत दिला.

मनपाकडून रस्ता खोदकामासाठी  मीटर प्रमाणे 2 हजार रुपये इतके शुल्क आकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. मात्र, असे असून देखील आयुक्त अजित रॉय यांनी गॅस पाईपलाईनचे काम करणार्‍या कंपनीकडून  एक  तृतियांश  इतका शुल्क आकारला आहे. त्यांचा हा निर्णय मनपा ठरावाच्या विरोधात आहे, असे सांगून महापौर फुर्तादो, नगरसेवक राहुल लोटलीकर यांनी आयुक्त रॉय यांना बरेच धारेवर धरले.

रॉय यांनी सांगितले, की गॅस पाईपलाईनचे काम हे उपयुक्त सेवांमध्ये येत असून त्याचा नागरिकांना फायदा होणार आहे. सदर प्रकल्प हा केंद्र सरकारचा आहे. अशा प्रकल्पांसाठी केवळ एक तृतियांश शुल्कच लागू करण्यासंबंधी केंद्रांची अधिसूचना आहे. त्याचे पालन करण्यात आले आहे. 

आयुक्त रॉय यांचे स्पष्टीकरण खोडून काढत संबंधित गॅस पाईपलाईन कंपनीने उर्वरीत शुल्क न भरल्यास त्यांना मनपाने दिलेली परवानगी रद्द केली जाईल.अशा आशयाचे पत्र संबंधित कंपनीला देण्याचा निर्णय झाला.

मनपातील साहाय्यक कर अधिकारी  यांची  दोन महिन्यांपूर्वी  दुसर्‍या खात्यात बदली करण्यात आली. त्यामुळे  सहाय्यक कर अधिकार्‍यां अभावी कामे रखडत असल्याची दखल घेऊन आयुक्त  रॉय यांनी दुसर्‍या अधिकार्‍यांची या पदावर नेमणुकीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी काही नगरसेवकांनी  बैठकीत केली.

मनपा कार्यक्षेत्रात 16 प्रभाग हागणदारी मुक्त म्हणून जाहीर करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर ज्या ठिकाणी सार्वजनिक शौचालयाची आवश्यक्ता आहे, तेथे बायोटॉयलेट उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला.