Mon, Apr 22, 2019 04:18होमपेज › Goa › खाणबंदी : सरकारतर्फे लवकरच फेरविचार याचिका

खाणबंदी : सरकारतर्फे लवकरच फेरविचार याचिका

Published On: May 11 2018 1:36AM | Last Updated: May 11 2018 12:26AMपणजी : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारी रोजी राज्यातील खाण व्यवसाय 15 मार्चपासून बंद करण्याचा आदेश दिला होता. तो आदेश दुरुस्त करून खाण उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी फेरविचार याचिका राज्य सरकारतर्फे दाखल करण्यास त्रिमंत्री  सल्लागार समितीने गुरुवारी मान्यता दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तीन दुरुस्त्या सुचवून खाणबंदी विषयीच्या फेरविचार याचिकेच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी फेरविचार याचिका दाखल करण्यात अर्थ नाही, असा सल्ला दिल्यानंतर मुख्य सचिवांनी याचिकेच्या मसुद्यासह साळवे यांचा सल्ला मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. पर्रीकर यांनी पूर्ण अभ्यासानंतर बुधवारी याचिका दाखल करण्यासाठी होकार कळवला असून काही सूचनाही दिल्या आहेत, अशी माहिती सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली.          

दरम्यान, दोन खाण कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात ‘स्पेशल लीव्ह पीटीशन’ दाखल केली असून 11 मे रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे सरकारचे लक्ष असून  त्यानंतर पुढील आठवड्यात खाण बंदीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.