Fri, Nov 16, 2018 21:36होमपेज › Goa › सांतीनेज कब्रस्तानात उद्यानाऐवजी ‘खुली जागा’

सांतीनेज कब्रस्तानात उद्यानाऐवजी ‘खुली जागा’

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 09 2018 1:35AM
पणजी : प्रतिनिधी

सांतीनेज पणजी येथील नूतनीकरण केल्या जाणार्‍या  मुस्लिम कब्रस्तानात उद्यान उभारले जाणार नाही. आराखड्यावर  उद्यानासाठी दाखवलेली जागा आता खुली जागा म्हणून दाखवली जाईल, असे आश्‍वासन बुधवारी  पार पडलेल्या  मनपा अधिकारी व मुस्लिम बांधवांच्या बैठकीत देण्यात आले. 

सांतीनेज पणजी येथील कब्रस्तानाच्या नूतनीकरणाच्या नावाखाली तेथे  सुमारे 800 चौरस मीटरहून अधिक जागेत  उद्यान  उभारण्यात येणार असल्याचे या प्रकल्पाच्या आराखड्यात दाखवण्यात आले होते. त्यानंतर याला काहींनी विरोध केला होता. कब्रस्तान हे मृत व्यक्‍तींना दफन करण्यासाठी आहे. एका बाजूने   कब्रस्तानमधील जागा अपुरी पडत असताना  तेथे उद्यान  बांधले जात असल्याची टीका केली जात होती. या पार्श्‍वभूमीवर मनपाकडून  ही बैठक बोलावण्यात आली होती.

मनपा सभागृहात आयोजित या बैठकीला आयुक्‍त अजित रॉय, महापौर विठ्ठल चोपडेकर, वास्तुविशारद  राहुल देशपांडे तसेच पणजी, ताळगाव व भाटले येथील काही मुस्लिम नागरिक उपस्थित होते.या बैठकीत  नूतनीकरण केल्या जाणार्‍या  मुस्लिम कब्रस्तानात उद्यानासाठी दाखवलेली जागा आता खुली जागा म्हणून दाखवली जाईल. या जागेचा त्यानंतर गरजेनुसार  वापर केला जाईल, असे सांगण्यात आले. त्याचबरोबर सध्या कब्रस्तानच्या परिसरात प्रार्थना सभागृह आहे. नूतनीकरण  दरम्यान लोकांना कुठलीही अडचण भासू नये यासाठी  सदर प्रार्थना सभागृह नजीक असलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये हलण्याची सूचना  यावेळी मनपा आयुक्‍त रॉय यांनी केली.