Sun, May 26, 2019 13:21होमपेज › Goa › कळंगुट समुद्रात नागपूरचा युवक बुडाला

कळंगुट समुद्रात नागपूरचा युवक बुडाला

Published On: May 22 2018 1:24AM | Last Updated: May 22 2018 1:04AMम्हापसा : प्रतिनिधी 

समुद्रस्नानासाठी कळंगुट समुद्र किनारी उतरलेल्या वरड, नागपूर येथील दोघा युवकांपैकी आशिष रामटेके हा 20 वर्षीय युवक बुडाला तर मंगेश लोखंडे या युवकाला जीवरक्षकांनी वाचविले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर घटना सोमवारी सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. हडफडे येथे एका हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमाचे स्वयंपाकाचे कंत्राट नागपूर येथील एका केटरिंग कंपनीला मिळाले होते. या कंपनीने स्वयंपाकासाठी वरड येथील पाच युवकांना गोव्यात  आणले   होते. हे पाचही युवक रविवारी मध्यरात्री गोव्यात दाखल झाले होते. 

पाचही युवक सोमवारी सकाळी समुद्रस्नानासाठी कळंगुट समुद्र किनारी गेले. त्यापैकी आशिष रामटेके व मंगेश लोखंडे हे दोघे मद्यप्राशन करून नशेत समुद्राच्या पाण्यात उतरले. काही वेळाने दोघेही पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. हा प्रकार   किनार्‍यावर असलेल्या त्यांच्या इतर मित्रांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच किनार्‍यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांना कल्पना दिली. 

जीवरक्षक पाण्यात जाईपर्यंत आशिष हा बेपत्ता झाला होता, तर मंगेश यास वाचविण्यात जीवरक्षकांना यश आले. बेपत्ता आशिष याचा कळंगुट पोलिसांनी किनारी पोलिस व कॅप्टन ऑफ पोर्टच्या सहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण तो सापडला नाही.