Thu, Aug 22, 2019 12:43होमपेज › Goa › खाण आंदोलक मुख्यमंत्र्यांना भेटणार

खाण आंदोलक मुख्यमंत्र्यांना भेटणार

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 14 2018 11:55PMपणजी : प्रतिनिधी

खाणी पुन्हा सुरु कराव्यात या मागणीसाठी आंदोलन करणारे खाण आंदोलक  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती  गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे नेते पुती गावकर यांनी दिली.

दरम्यान,  गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटतर्फे सलग चौथ्या दिवशी पणजी येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरुच ठेवले. मात्र, कुठल्याही राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली नाही.

गावकर म्हणाले, की राज्यातील खाण व्यवसाय बंद करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानेे फेब्रुवारी महिन्यात दिले  होते. तेव्हापासून ते आत्तापर्यंत सरकार खाण प्रश्‍नी केवळ तोडगा काढण्याचे आश्‍वासन देते.परंतु जवळपास चार महिने झाले तरीही सरकार तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहे. खाणप्रश्‍नी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पणजीबरोबरच  साखळी, धारबांदोडा व सावर्डे  येथे देखील धरणे  आंदोलन केले जात आहे. सरकार जो पर्यंत खाणप्रश्‍नी तोडगा काढत नाही, तो पर्यंत आंदोलन सुरुच ठेवले जाणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  उपचारानंतर  गोव्यात परतले आहेत. खाणींबाबत त्यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न खाण आंदोलन करणार आहेत.

खाण आंदोलकांनी 11 जूनपासून पणजी येथे आंदोलनास सुरुवात केले आहे. मात्र, अजूनही त्यांची विचारपूस करण्यासाठी कोणीच त्या ठिकाणी फिरकले नसल्याने खाण आंदोलकांकडून नाराजी व्यक्‍त केली जात आहे. आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आझाद मैदान परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.