Thu, May 23, 2019 20:25
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › खाणबंदीवर केंद्राकडून लवकरच तोडगा : सावंत

खाणबंदीवर केंद्राकडून लवकरच तोडगा : सावंत

Published On: Aug 17 2018 1:34AM | Last Updated: Aug 17 2018 1:34AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात खाणबंदीमुळे सर्व गोमंतकीयांना भेडसावत असलेल्या समस्येवर केंद्र सरकार लवकरच योग्य तो तोडगा काढेल,असा   विश्‍वास   सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

येथील जुन्या सचिवालयासमोर आयोजित  शासकीय स्वातंत्रदिन कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.  उपचार घेण्यासाठी अमेरिकेस गेलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत सभापती सावंत यांनी  ध्वजारोहण केले.

यावेळी सावंत म्हणाले, की खनिज व्यवसाय हा रोजगार पुरवणारा  राज्याचा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र सध्या खाणीवर आलेल्या बंदीमूळे अनेक कुटुंबीयांवर ओढवलेल्या संकटाची सरकारला जाणीव आहे. यासाठी मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांची शिष्टमंडळाने भेट घेतली आहे. खाण समस्येवर केंद्राच्या हस्तक्षेप करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली असून लवकरच राज्यात खाणी पुन्हा कार्यरत होणार आहेत. 

राज्यात येत्या पाच वर्षात 10 हजार रोजगाराची संधी उपलब्ध करण्याचे राज्य सरकारचे लक्ष्य आहे. यासाठी तुये येथे इलेक्ट्रॉनिक सिटी आणि चिंबल येथे आयटी प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. राज्यातला सुशिक्षीत युवा वर्ग पोटापाण्यासाठी परराज्यात जाऊ नये यासाठी स्थानिक रोजगार आणि उद्योग निर्मितीला प्राधान्य दिले जात आहे. केंद्राकडून राज्यातील साधनसुविधा वृद्धीसाठी सुमारे 15 ते 20 हजार कोटींची मदत दिली गेली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा वाढण्यासाठी मूल्यवर्धीत शिक्षण प्राथमिक वर्गापासून लागू करण्यात आले आहे. नागरीकांना आरोग्य व उपचाराच्या सुविधा मिळाव्यात म्हणून दयानंद सामाजिक योजना सर्वांना उपयोगी पडत असल्याचे सावंत यांनी सांगितले. 

कचरा ही राज्यासमोरील मोठी समस्या असून प्लास्टीक कचरा कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. साळगाव येथे आधूनिक कचरा प्रकल्पाची क्षमता 100 वरून 250 टनापर्यांत वाढवण्यात आली असून बायंगिणी आणि काकोडा येथेही नवे कचरा प्रकल्प स्थापन केले जाणार आहेत. निसर्गाचे आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्लास्टीक बंदी अंमलात आणण्याची गरज असून आजच्या स्वातंत्र्यादिनी आपण सर्वजण प्लास्टीक वापरणार नाही, अशी शपथ घेऊया , असे सावंत म्हणाले.

सभापती सावंत यांनी ध्वजारोहणानंतर पोलिस पथकाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली.सावंत यांच्याहस्ते पोलिस दलातील अधीक्षक दिनराज गोवेकर, निवृत उपअधीक्षक रमेश गावकर, निरीक्षक सिद्धांत शिरोडकर, शिपाई झूबेर मोमीन या अधिकार्‍यांना राष्ट्रपती पदक देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, जलस्त्रोत मंत्री जयेश साळगावकर, मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा, पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर आदी मान्यवर हजर होते.