होमपेज › Goa › खाणी त्वरित सुरू करा, अन्यथा विधानसभेवर मोर्चा

खाणी त्वरित सुरू करा, अन्यथा विधानसभेवर मोर्चा

Published On: Jun 12 2018 12:52AM | Last Updated: Jun 12 2018 12:43AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाण व्यवसाय त्वरित  सुरू  करावा. खाणी सुरू करण्यासाठी  उपाययोजना करण्यास सरकारला अपयश आल्यास येत्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेवर धडक मोर्चा नेऊ, असा इशारा गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटचे नेते पुती गावकर यांनी फ्रंटतर्फे  येथील आझाद मैदानावर सोमवारी आयोजित धरणे आंदोलनावेळी दिला. केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रसंगी दिल्‍लीतही रॅली काढली जाईल. खाणप्रश्‍नी तोडगा निघेपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.

खाण अवलंबितांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आझाद मैदान परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याशिवाय खबरदारी म्हणून पणजी कदंब बसस्थानक परिसरातही पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

गावकर म्हणाले, राज्यातील खाण व्यवसाय सुरू व्हावा, अशी मागणी खाण अवलंबितांकडून केली जात आहे. खाणप्रश्‍नी यशस्वी तोडगा काढण्याचे आश्‍वासन कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी दिले होते. त्यानुसार तोडगा काढण्यासाठी खाण अवलंबितांच्या जाहीर सभेत सरकारला आश्‍वासन  पूर्ण करण्यासाठी  11 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. दिलेल्या मुदतीत सरकारने  तोडगा न काढल्यास सोमवारपासून पणजीतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन  करू, असा इशाराही देण्यात आला होता, त्यानुसार आणि खाण अवलंबितांना दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता न झाल्याने गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटतर्फे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. खाण व्यवसाय पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.

खाण अवलंबित सांगे, साखळी  व धारबांदोडा येथेही मंगळवार दि. 12 जूनपासून खाण अवलंबितांकडून  धरणे आंदोलन करणार आहेत. राज्यातील खाण व्यवसायावर मोठ्या संख्येने लोक अवलंबून आहेत. त्यामुळे सदर विषय गांभीर्याने घेऊन खाणींबाबत सरकारने त्वरित तोडगा काढणे अपेक्षित असल्याचेही गावकर यांनी सांगितले.