Mon, Apr 22, 2019 11:42होमपेज › Goa › म्हापशात 26 पासून प्लास्टीक विक्री,वापरावर बंदी

म्हापशात 26 पासून प्लास्टीक विक्री,वापरावर बंदी

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 10:23PM

बुकमार्क करा
म्हापसा  : प्रतिनिधी

 प्लास्टीक वापरामुळे होणारा घन कचरा व प्रदूषणाने अनेक समस्या उद्भवतात. यामुळे म्हापसा पालिकेने येत्या प्रजासत्ताकदिनापासून शहरात प्लास्टीक पिशव्यांची विक्री व वापरावर बंदी घालण्याचा निर्ण़य घेतला आहे,अशी माहिती नगराध्यक्ष रोहन कवळेकर यांनी दिली.    येथील श्री देव बोडगेश्‍वराच्या जत्रेत प्लास्टीक वापरावर देवस्थान समितीने बंदी घातल्याने यंदाचा जत्रोत्सव प्लास्टीकमुक्त करण्यात यश आले. हेच  यश टिकवून  ठेवून शहर प्लास्टीकमुक्त करण्याच्या उद्देशाने पालिका मंडळाने हा निर्णय घेतला. पालिका मंडळाने अशा आशयाचा ठरावही पालिका मंडळाच्या बैठकीत मंजूर केलेला आहे,असे कवळेकर यांनी सांगितले.     प्लास्टीक बंदी आदेश जारी करण्यापूर्वी मार्केटमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. स्वंय सहाय्य गट, सामाजिक संघटना, देवस्थान समित्या, व्यापारी संघटना, हॉटेल व्यवसायिक, शैक्षणिक संस्था यांचे सहकार्य या जनजागृती मोहिमेत घेण्यात येईल,असेही  नगराध्यक्षांनी सांगितले.

सध्या मासळी व भाजी मार्केटमध्ये विक्रेते गरज नसताना प्लास्टीक पिशव्या ग्राहकांना वस्तू समवेत देतात. काही ग्राहक स्वतः कापडी पिशव्या घेऊन बाजार खरेदीसाठी जातात. तरीही मासळी व भाजी विक्रेत्यांकडून त्यांना प्लास्टीक पिशव्यांतून माल दिला जातो. त्यामुळे लोकांच्या घराकडेही अकारण प्लास्टीकचा कचरा तयार होतो. हा प्लास्टीकचा कचरा पुन्हा पालिका कर्मचार्‍यांना गोळा करावा लागतो, असे  कवळेकर म्हणाले. म्हापसा शहरातून रोज 25 टन घन कचरा तयार होतो,यात मोठ्या प्रमाणात प्लास्टीकच्या कचर्‍याचा समावेश असतो. रोज गोळा होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी साळगाव घन कचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे कचरा सोपवण्यासाठीचे   सोपस्कार पूर्ण करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कचरा विल्हेवाटीसाठी प्रकल्पात पाठविला जाईल, अशीही माहिती नगराध्यक्षांनी दिली.