पणजी : प्रतिनिधी
गोवा व कर्नाटक राज्यांमध्ये वादाचा विषय बनलेल्या म्हादई नदीच्या पाणी वाटपाबाबत बुधवारी दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मध्यस्थी केली. शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे उत्तर कर्नाटकातील जनतेसाठी पेयजल पुरवठ्यासाठी म्हादईच्या पाण्याची मागणी केली. कर्नाटकाच्या शिष्टमंडळाचे म्हणणे पर्रीकर यांनी ऐकून घेतले असून कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.
गोवा आणि कर्नाटक राज्यांमधील म्हादई पाणीवाटप प्रश्न राष्ट्रीय जलतंटा आयोगासमोर प्रलंबित आहे. कळसा- भांडुरा जलप्रकल्पाद्वारे म्हादईचे 7.56 टीएमसी पाणी वळवण्याचा कर्नाटकाचा प्रयत्न आहे. हे पाणी कर्नाटकातील हुबळी, धारवाड शहर तसेच बेळगाव, गदग जिल्हातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी हवे असल्याचे कर्नाटकाचे म्हणणे आहे. कर्नाटक राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून त्या पार्श्वभूमीवर बुधवारी शहा यांच्या पुढाकाराने दिल्लीत झालेल्या या बैठकीला महत्त्व आले आहे.
दिल्लीत बुधवारी कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याशी चर्चा केली. या बैठकीला शहा यांच्यासह कर्नाटकाचे भाजप प्रभारी तथा केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल , पर्यावरण व वनमंत्री प्रकाश जावडेकर, अनंत कुमार, खासदार प्रल्हाद जोशी उपस्थित होते. बैठकीनंतर बाहेर आलेले येडियुराप्पा पत्रकारांना म्हणाले, की मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासमवेत चांगल्या वातावरणात बैठक पार पडली आहे. चर्चा समाधानकारक झाली.
आश्वासन दिले नाही : पर्रीकर
मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की, दिल्लीत झालेल्या बैठकीत कर्नाटकाचे भाजप प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासोबत म्हादई विषयाबाबत सविस्तर चर्चा केली. कर्नाटकची बाजू पर्रीकर यांनी ऐकून घेतली असून कोणतेही आश्वासन दिलेले नाही.