Tue, Apr 23, 2019 10:10होमपेज › Goa › कर्नाटकने म्हादईवरचा बांध स्वतःच हटवला 

कर्नाटकने म्हादईवरचा बांध स्वतःच हटवला 

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 25 2018 1:02AMपणजी : प्रतिनिधी

गोव्याच्या वाढत्या दबावापुढेे माघार घेत कर्नाटकाने म्हादई नदीच्या प्रवाहावर  कळसा-भांडुरा नाल्यावर कणकुंबी येथे  बांधलेला बांध स्वत:च फोडला आहे. तेथील यंत्रसामुग्रीही हटवून  अन्यत्र हलवण्यात आली आहे. त्यामुळे गोव्याकडे वाहणारा म्हादईचा प्रवाह पूर्ववत वाहू लागला आहे, असे म्हादई बचाव अभियानचे सचिव राजेंद्र केरकर यांनी बुधवारी सांगितले.

कणकुंबी  येथे बुधवारी केरकर यांनी दुपारी भेट दिली. त्यावेळी कळसा-भांडुरा नाल्यावर कर्नाटक निरावरी निगमने बांधलेला बांध फोडलेला असल्याचे त्यांना आढळून आले. कर्नाटकाने  तेथील स्थिती पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न केला असल्याने पाण्याचा प्रवाह पूर्वीप्रमाणे वाहू लागला आहे,असे केरकर यांनी सांगितले.

केरकर म्हणाले , की कणकुंबी येथे गेल्या महिन्यात बांध बांधून हे पाणी अडविले गेले होते. येथील बांधाजवळ ठेवण्यात आलेली यंत्रसामुग्री आता संबंधित कंत्राटदार कंपनीच्या कार्यालयाजवळ नेण्यात आली आहे. गोव्यात खळबळ माजल्यानंतर व गोवा सरकारने लवादाकडे अवमान याचिका सादर करण्याचा इशारा दिल्यामुळे कर्नाटक निरावरी निगमने तो बांध फोडून टाकला असावा, असे पर्यावरणप्रेमींना वाटत आहे.

गोवा व कर्नाटकमधील म्हादई पाणी प्रश्न अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. गोवा सरकारला या वादामुळे टीकेचे धनी व्हावे लागले आहे. कर्नाटकमध्ये गोव्याच्या निषेधार्थ वारंवार बंद पाळले जात आहेत. कर्नाटकला म्हादई नदीचे पाणी वळवण्यास गोमंतकीयांचा आक्षेप आहे. म्हादई पाणी तंटा लवादासमोर आता अंतिम टप्प्यातील युक्‍तिवाद सुरू झाले आहेत. अशावेळीच कर्नाटकच्या यंत्रणेने म्हादई नदीच्या प्रवाहावर बांध बांधून पाणी अडविल्याचे वृत्त येऊन गोव्यात धडकले होते. आपण पाहणी करून बांध बांधण्यात आल्याचे स्पष्ट केले होते,असेही केरकर यांनी सांगितले.

गोव्याचे अतिरिक्‍त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनीही कर्नाटकाने बांध घातल्याची घटनेची गंभीरपणे दखल घेतल्यानंतर मंत्री विनोद पालयेकर तसेच गोव्याच्या अभियंत्यांच्या पथकानेही कणकुंबी येथे कळसा-भांडुरा नाल्याला भेट दिली होती. गोव्याचे मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांनी गेल्या पंधरवड्यात कर्नाटक सरकारला पत्र पाठवून कर्नाटकने बांध बांधून न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याचे कळवले होते.