Tue, Jul 23, 2019 19:05होमपेज › Goa › विधानसभेत गदारोळ; तिसर्‍या दिवशीही प्रश्‍नोत्तर तास वाया

विधानसभेत गदारोळ; तिसर्‍या दिवशीही प्रश्‍नोत्तर तास वाया

Published On: Jul 24 2018 1:33AM | Last Updated: Jul 24 2018 1:33AMपणजी : प्रतिनिधी

फार्मेलिनयुक्‍त मासळीवरून विरोधी पक्ष काँग्रेसने सोमवारी  सभागृहात पुन्हा एकदा गदारोळ केल्याने सलग तिसर्‍या दिवशी प्रश्‍नोत्तर तास वाया गेला. काँग्रेस आमदारांनी माजवलेल्या गदारोळामुळे  सभागृहाचे कामकाज सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी दुपारी 12.30 वाजेपर्यंत तहकूब केले. 

‘प्रश्‍नोत्तर तास नको, फार्मेलिनयुक्‍त  मासळीवर  आधी चर्चा करा’, अशी मागणी करून काँग्रेसने स्थगन प्रस्ताव मांडला होता, परंतु  सभापतींनी सभागृह कामकाज नियम दाखवून स्थगन प्रस्ताव फेटाळला. 

विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले, सरकारला जनतेच्या आरोग्याच्या प्रश्‍नाचे गांभीर्य नाही. फार्मेलिनयुक्‍त मासळीचा विषय हा जिव्हाळ्याचा असून तो 15 लाख लोकांशी संबंधित आहे. या विषयावर यापूर्वीदेखील स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र तो फेटाळण्यात आला.  आम्ही केवळ चर्चा व्हावी, अशी मागणी करत आहे. मांडवी पूल किंवा महामार्ग अन्य लोकांप्रमाणे  ब्लॉक केला नसल्याचे त्यांनी सांगितले.
या विषयावर अहंकार बाजूला ठेवून स्थगन प्रस्तावाला मंजुरी द्यावी.  सभागृहाचा वेळ  आम्हाला वाया घालवायचा नाही, असेही कवळेकर म्हणाले.

सभापती डॉ. सावंत यांनी  काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव फेटाळला. दोन दिवस सभागृहाचे कामकाज आपल्याला तहकूब करायचे नव्हते. मात्र, तसे करण्यास भाग पाडण्यात आले. एकाच विषयावर कितीवेळा  चर्चा करायची?   फार्मेलिनबाबत दुपारी 12.30 वाजता  लक्षवेधी सूचनेवेळी बोलण्याची संधी आहे, असे सभापतींनी सांगितले. मात्र, विरोधकांकडून  गोंधळ सुरुच राहिला. या गोंधळातच आमदार ग्लेन टिकलो यांनी  प्रश्‍न विचारला व नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी उत्तर दिले व सभापतींनी कामकाज तहकूब केले.