Fri, Apr 19, 2019 07:59होमपेज › Goa › पणजी-मडगाव मार्गावर तीन तास ‘मेगा ब्लॉक’

पणजी-मडगाव मार्गावर तीन तास ‘मेगा ब्लॉक’

Published On: Aug 14 2018 1:04AM | Last Updated: Aug 14 2018 1:04AMमडगाव : प्रतिनिधी

आगशी जंक्शनवर सुरू असलेल्या रस्ता दुरुस्ती कामासाठी मडगाव पणजी बगलरस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आल्याने सोमवारी मडगाव-पणजी मार्गावरील वाहतुकीला दिवसभर मेगा ब्लॉकचा सामना करावा लागला. मडगाववरून निघालेली वाहने तीन तासांनंतर पणजीत पोहोचण्याच्या प्रकारांमुळे विद्यार्थी, चाकरमाने आणि रुग्णांचे बरेच हाल झाले. या वाहतूक कोंडीत प्रवासी आणि कदंब बसेसबरोबर शटलबसेस आणि रुग्णवाहिकादेखील अडकून पडल्या होत्या.

मेगा ब्लॉकमुळे नुवेपासून आगाशीपर्यंत दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. या मेगा ब्लॉकचा फटका मडगाव बसस्थानकावरून पणजीपर्यंत प्रवास करणार्‍या चाकरमान्यांना आणि विद्यार्थ्यांना जास्त बसला. मेगा ब्लॉकमध्ये प्रवासी बसेस आणि कदंब बसेस तसेच शटल बसेस सुमारे अडीच ते तीन तास एकाच जागी अडकून पडल्या होत्या.सकाळी सात वाजता मडगाव बस स्थानकावरून सुटलेल्या कदंबच्या बसेस साडेनऊ ते दहा वाजता पणजीत दाखल झाल्या. 

विद्यार्थिनी संस्कृती आईर यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना सोमवारच्या मेगा ब्लॉकमुळे बरीच गैरसोय झाली. पणजीत उतरून गोवा विद्यापीठाकडे जाणारी बस धरून विद्यापीठात पोहोचेपर्यंत दुपार झाली होती, असे आईर यांनी सांगितले.

सावर्डे, कुडचडे, सांगे, केपे आदी भागातील चाकरमाने मडगाव कदंब बसस्थानकावर दुचाकी ठेवून बसने पणजीत जातात. त्यांना या मेगा ब्लॉकमुळे बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला. यात सरकारी कर्मचार्‍यांची संख्या लक्षणीय होती. काही कर्मचार्‍यांनी दै.‘पुढारी’शी बोलताना ते दुपारी कार्यालयात पोहोचल्याचे सांगितले. सायंकाळीसुद्धा असाच मेगा ब्लॉक होता त्यामुळे दररोजच्या वेळेपेक्षा तीन तास उशिराने लोक आपल्या घरी पोचले. या मेगा ब्लॉकमध्ये रुग्णवाहिकासुद्धा अडकून पडल्या होत्या. मडगाववरून सुरु झालेली वाहतूक नुवे येथून अडकून पडली होती. हा मेगा ब्लॉक बांबोळीपर्यंत होता. बांबोळीच्या गोमेकॉत जाणारे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईकसुद्धा मेगा ब्लॉकमध्ये अडकले होते.

आठवड्याचा पहिला दिवस असल्याने सोमवारी पणजीत जाणार्‍या वाहनांची संख्या जास्त होती. सकाळी कोणतीच पूर्वकल्पना न देता पिलार येथे जाणार्‍या जंक्शनवर दुरुस्ती कामाला सुरुवात करण्यात आली होती. आगशी ते सांत आंद्रे पर्यंतचा बगलमार्ग एकेरी वाहतुकीसाठी वापरण्यात आला होता. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन पणजी आणि मडगावच्या दोन्ही बाजूनी अशी वीस किलोमीटरपर्यंत वाहनांची रांग लागली होती. मेगा ब्लॉकमुळे हजारो लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूने अडकून पडले होते. 

रत्नाकर देसाई यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, रस्ता दुरुस्तीचे काम सुट्टीच्या दिवशी हाती घेणे गरजेचे होते. ऐन कामकाजाच्या दिवशी रस्ता खोदण्यात आल्याने लोकांना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला. दिवसभर वाहतूक कोंडी सुरू होती पण वाहतूक नियंत्रणात आणण्यासाठी थोडेच पोलिस उपस्थित होते. काही विद्यार्थी सोमवारी नोकर्‍यांच्या मुलाखती देण्यासाठी पणजीत जात होते मात्र, वाहतूक कोंडीमुळे त्यांना मुलाखतीवर पाणी सोडावे लागले.